
आशाताई बच्छाव
अपयश यशाची पहिली पायरी
आयुष्यात यश मिळवण्यासाठी सातत्याने एखाद्या गोष्टीच्या मागे राहावे लागते.त्यासाठी लागते अपार मेहनत.जे लोक सतत प्रयत्नशील असतात त्यांना आपले ध्येय गाठण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही.आपण फक्त त्यांनी मिळवलेले यश बघतो.पण त्यासाठी त्यांनी केलेला त्याग, त्यामागे त्यांचे असलेले कष्ट आपल्याला दिसत नाही.असं अजिबात नसतं की या माणसांना कधी अपयशाचा सामना करावा लागत नाही.पण त्यांची प्रबळ इच्छाशक्ती त्यांना यशाच्या मार्गाकडे नेते.अपयशातून बरेच काही शिकून ही मंडळी यश संपादन करतात.
अपयशातही एक संधी दडलेली असते.त्यातूनच एखाद्या रचनात्मक कामाची सुरुवात होते आणि आपला भाग्योदय होतो.वेळ फार बलवान आहे.अपयशामुळे जीवनात आलेले नैराश्य,दु:ख वेळेसोबत हळूहळू कमी होते.वाईट काळ असला तरी आपल्या जीवनात चांगली वेळसुद्धा येणार हा आत्मविश्वासच आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातो.जेव्हा आपण एखाद्या कार्यात अपयशी ठरतो तेव्हा या काळात खचून न जाता आपण नवीन चांगल्या कल्पनांना वाव देऊ शकतो.नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द निर्माण करू शकतो.त्यासाठी आवश्यक आहे तो दृढनिश्चय.त्यामुळे मनातील नकारात्मकता कमी होते आणि आपण आपल्या ध्येयासाठी जोमाने काम करू शकतो.मनात जिद्द असेल तर तुम्हाला अनेक वाटा सापडतील.आपल्या कडून झालेल्या चुकांची दुरुस्ती करून त्याचत्याच चुका परत होणार नाहीत याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.खास करून विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी.हल्ली काही मुले अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार करतात. नव्हे,सरळ सरळ आत्महत्या करतात.त्यांच्या या कृतीमुळे घरच्यांची काय अवस्था होत असेल याचा विचारही करवत नाही.एकदा अपयश आलं म्हणजे सगळं काही संपलं असा त्याचा अर्थ का घ्यावा?कठोर मेहनत, प्रयत्न आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संयम राखून आपण नक्कीच यश संपादन करू शकतो.”प्रयत्नांती परमेश्वर” हे बोधवाक्य आपल्याला हीच जाणीव करून देते.
हल्ली इंस्टंटचा जमाना आहे.प्रत्येकाला पटकन यश संपादन करण्याची घाई असते.पण यामुळे आपण एक गोष्ट गमावतो,ती म्हणजे आपली सहनशीलता.इंस्टंट मिळणारे यश किती काळ टिकेल याची शाश्वती देता येत नाही.जर अशा घाईमुळे पदरी अपयश पडले तर मग आपली चिडचिड होते.आपला स्वभाव हळूहळू चिडका होतो.त्यामुळे मानसिक स्वास्थ्य नक्कीच खराब होते.म्हणूनच यशाने मातू नये आणि अपयशाने खचू नये.नीट विचार करून अडचणींवर मार्ग काढला तर यश निश्चितच मिळू शकते.त्यासाठी थोडी वाट बघण्याची मानसिकता हवी.यशाला जर सहनशीलतेची जोड मिळाली तर यशाचा आनंद कैकपटीने वाढतो.अपयश अनेक मोठमोठ्या व्यक्तींनी आपल्या आयुष्यात अनुभवलेले आहे.त्यातूनच त्यांनी यश कमाविले.ब-याच जणांना आपल्या सुरूवातीच्या काळात अपयश अनुभवावे लागते.हे गृहित धरूनच आपण यशाकडे आपली वाटचाल सुरू करावी म्हणजे अपयश पदरात पडले तरी त्याचे वाईट न वाटता आणखी जोमाने आपण प्रयत्न करू शकतो.आपल्याला यशाचे शिखर गाठायचे तर यशमंदिराची पहिली पायरी ओलांडावीच लागते.यश मिळाल्यावर आता पुढे कुठलेच अपयश जीवनात येणार नाही ही भ्रामक कल्पना आहे.यश मिळाल्यावरही अनेक अडचणींचा सामना आपण करत असतो.आपणच आपली ताकद ओळखून आपला पल्ला गाठायचा असतो.नशीबाला दोष देत जगण्यापेक्षा यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे हेच खरे जीवन.जे लोक आपल्या ध्येयासाठी समर्पित असतात असेच लोक यशस्वी होतात.
यशस्वी लोकांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवणेही जरूरी आहे.वेळेलाही महत्त्व देऊन आपले काम वेळेतच करण्याचे कसब हवे.एकंदरीतच माणसाने अत्यंत जागरूकतेने ध्येय गाठत पर्यंत प्रयत्नशील, कार्यक्षम असावे.
लैलेशा भुरे
नागपूर