
आशाताई बच्छाव
अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी २ हजार रुपये लाच स्विकारताना आरोपी रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
शत्रुघ्न काकडे पाटील:-जिल्हा प्रतिनिधी
परभणी:-
परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामधील डॉक्टरांसोबत आपली चांगली ओळख आहे असे सांगून एका लाभार्थ्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी २ हजार रूपये लाच स्विकारताना एका आरोपीस रंगेहात पकडण्यात आले आहे. परभणीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. १४) दुपारी ही कारवाई केली.
यातील आरोपीचे नाव विष्णू बापूराव कोरडे (वय ३२ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. ठाकरे नगर, परभणी) असे आहे. ४२ वर्षीय पुरुष तक्रारदारास अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढायचे होते. विष्णू कोरडे यांनी आपली डॉक्टरांसोबत ओळख असून हे प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी एकूण ७ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तसेच त्याने फोन पे द्वारे ३ हजार रूपये स्विकारले. दरम्यान, तो लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दिनांक १३ जून रोजी एसीबी कार्यालयाकडे आली. त्यावरून बुधवारी पडताळणी करण्यात आली. यात आरोपी कोरडे याने पडताळणी दरम्यान मागितलेली लाचेची रक्कम २ हजार रुपये लागलीच आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ५ हजार रुपये देण्याबाबत पंचासमक्ष पुन्हा लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.सापळा कार्यवाही दरम्यान लाचेची रक्कम २ हजार रुपये आरोपी विष्णू कोरडे याने तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्वतः स्वीकारली. त्यास लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पर्यवेक्षण अधिकारी अशोक इप्पर (पोलीस उप अधीक्षक, परभणी) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे, पोहेकॉ मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार, पोका मो. जिब्राईल, राम घुले, चापोह कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.