Home सामाजिक गावातील दिवाळी! बुलढाणा जिल्ह्यातील पारंपरिक दिवाळीबद्दल लिहिले स्वप्निल देशमुख यांनी…

गावातील दिवाळी! बुलढाणा जिल्ह्यातील पारंपरिक दिवाळीबद्दल लिहिले स्वप्निल देशमुख यांनी…

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20221024-WA0128.jpg

गावातील दिवाळी!

बुलढाणा जिल्ह्यातील पारंपरिक दिवाळीबद्दल लिहिले स्वप्निल देशमुख यांनी…
…..
काळ बदलला, जगण्याची शैली बदलली, आनंदाच्या कल्पना बदलल्या, ताण बदलले, या बदलत्या जगात जगताना ग्रामीण भागात पूर्वापार पद्धतीने चालत आलेली दिवाळी साजरी करण्याची परंपरा अद्यापही जपली जात असून, या परंपरेनुसार हा सण साजरा केला जात आहे.

अश्विन महिन्याची सुरुवात झाली की शारदीय नवरात्रोत्सव येतो. या सणात नऊ दिवस आदिशक्तीचा जागर केला जातो. १०व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. मग दिवाळीची चाहूल लागते. या सणाच्या तयारीची लगबग घरोघरी सुरू होते. घराची साफसफाई करणे, रंगरगोटी करणे, घरात फराळांचे पदार्थ तयार करणे अशा कामांची लगबग सुरू होते. फराळ तयार करण्यात महिलांमध्ये अधिक रुची असते, तर बांबूपासून पारंपरिक आकाशकंदील बनविण्यात पुरुषांना रस असतो, असे चित्र दिवाळीचा सण अवघ्या सात-आठ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ग्रामीण भागातील घरांमध्ये दिसून येते.
खरीप हंगामातील पिके तयार झालेली असतात. या उत्पादनांची विक्री झाल्याने प्रत्येकाच्या हातात पैसा खेळत असतो. त्यामुळे प्रत्येक जण दिवाळी साजरा करताना हात आखडता घेत नाही. धनत्रयोदशीपासून खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते. या दिवशी सोनेखरेदीची परंपरा आहे. या परंपरेनुसार प्रत्येक जण आपल्या परीने कमी-जास्त प्रमाणात सोने खरेदी करतो. तसेच प्रत्येकाच्या घरासमोर आकाशकंदील लावले जातात आणि अंगणात रात्री पणत्या किंवा मेणबत्त्या लावल्या जातात. पणत्यांच्या प्रकाशाने घर उजळून निघते. हे दृश्य पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.

प्रत्येकाच्या घरासमोरील अंगणात महिलांचे रांगोळीचे कलाविष्कार नजरेस पडतात. नरक चतुर्दशीदिवशीच्या आदल्या दिवशी रानात जाऊन कारेटी (काकडीवर्गीय छोटे कडू फळ) घरी आणली जातात. रात्री आबालवृद्ध नरकासुराची प्रतिमा तयार करतात. ही प्रतिमा तयार करताना भाताचे गवत, बांबू, गोणपाटे, कागद या वस्तूंचा वापर केला जाते. त्या प्रतिमेमध्ये फटाके भरले जातात. मग त्याची रात्री धिंड काढली जाते आणि पहाटे नरकासुराचे दहन केले जाते. नरकासुर दहनापूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या खड्याने रस्त्यावर शुभ दीपावली, हॅपी दिवाळी असे शुभेच्छा संदेश लिहिले जातात. त्यानंतर घरी येऊन अभ्यंगस्नान केले जाते.

अभ्यंगस्नानासाठी लागणारे पाणी मोठ्या माठात किंवा हंड्यामध्ये तापवले जाते. हा माठ किंवा हंडा नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी स्वच्छ धुतला जातो. त्यानंतर त्यावर कारेटी किंवा फुलांची माळ घातली जाते. त्यानंतर त्यामध्ये पाणी तापवले जाते. हे स्नान करताना सुगंधी उटणे आणि विशेष साबण लावला जातो. त्यानंतर घरासमोरील तुळशीवृंदावनासमोर कारेटी फोडून ‘गोविंदा रे गोपाळा’ असे म्हटले जाते आणि फोडलेल्या कारेट्याची बी खाल्ली जाते. त्यानंतर भातापासून बनविलेले पोहे हाताने पाठीमागे उडवून त्यानंतर ते प्रसाद म्हणून खाल्ले जातात. बच्चे कंपनी फटाके फोडण्याचा मनमुराद आनंद लुटते. फुलबाज्यांच्या तारा उलट्या करून त्या झाडांवर फेकल्या जातात. हे दृश्य आकाशातील ताऱ्यांप्रमाणे दिसते. प्रत्येक जण गावातील मंदिरांमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतो. त्यानंतर दिवाळीसाठी तयार केलेल्या फराळाचा नैवैद्य घरच्या देवाला दाखविल्यानंतर तो गायीला खायला दिला जातो.

सकाळी ११ पर्यंतच्या वेळेत प्रत्येक जण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि फराळाचा आस्वाद घेतात. फराळामध्ये करंजी, चकल्या, लाडू, शंकरपाळी, कांदा पोहे, गोड पोहे (गुळापासून तयार कोलेले) असे पदार्थ असतात. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना फराळाच्या पुड्या दिल्या जातात. काही काळापूर्वी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रीटिंगकार्ड देण्याची पद्धत होती; पण ही पद्धत आता कालबाह्य झाली आहे. ही ग्रीटिंगकार्ड घरी बनविली जायची.

दिवाळीच्या दिवसांमध्ये घरोघरी लावलेले पारंपरिक आकाशकंदील आणि पणत्या व मेणबत्त्यांचा प्रकाश घराला तेजोमय करून टाकत असतो आणि घरामध्ये आल्हाददायक वातावरण तयार होते. कारण घरात आणि रस्त्यावर मन उजळलेल्या माणसांचा राबता असतो. दिवाळीच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आमाप उत्साह असतो आणि पाहुणे, नातेवाईकांचे येणे जाणे असते. त्याचप्रमाणे प्रत्येक जण फराळाचा आस्वाद आणि संवादाचा आनंद लुटतो. वाचनासाठी दिवाळी अंक असतात.

Previous articleअतिवृष्टीचे पंचनामे करून ओलादुष्काळ जाहीर करा. दिनेश आवडके
Next articleमा.खा.श्री.अशोकजी नेते यांनी दाखवीली माणुसकी…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here