आशाताई बच्छाव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळा उत्साहात
अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पर्जन्यधारांनीही हजेरी लावली. त्यामुळे उपस्थितांचा उत्साह वाढला होता. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.
ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी स्वातंत्र्य सैनिक, शहिद परिवार सदस्य यांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ.वसंतराव खंडेलवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपवनसंरक्षक अर्जूना, अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तसेच सर्व सदस्य व सर्व यंत्रणा प्रमुख, तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे परिवारजन,शहिदांचे विरपिता, विरमाता, विरपत्नी आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुरु असलेल्या पर्जन्यधारांनी उपस्थितांचा उत्साह वाढला होता.
विविध पुरस्कारांचे वितरण
कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरणही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.
महा आवास अभियान 2.0 ग्रामीण जिल्हास्तरीय पुरस्कार: प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम क्रमांक-अकोट, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक-वाकोळी, दिव्तीय क्रमांक माळेगाव बाजार, तृतीय क्रमांक राजुरा घाटे.
राज्य पुरस्कृत आवास योजना: सर्वोकृष्ट तालुका प्रथम क्रमांक- तेल्हारा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक वाकोडी, व्दितीय क्रमांक सोनोरी बोपोरी, तृतीय क्रमांक अडगांव बु..
आदर्श तलाठी विभागस्तरावरील पुरस्कार : सन 2020-21 चा तहसील कार्यालय, अकोलाचे तलाठी एम.एस. कदम. सन 2021-22 चा तहसील कार्यालय मुर्तिजापूरचे तलाठी विशाल गणेश काटोले.
आयुष्यमान भारत पुरस्कार : रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. धवल भट व डॉ. दिनेश पवार यांना 3 हजार 890 रुग्णांना लाभ दिल्याबद्दल सन्मानित केले.
तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा सन 2019-20 राष्ट्रीय स्तर परिक्षेत शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या 16 विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन निलेश गाडगे यांनी केले.