राजेंद्र पाटील राऊत
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मंगळवारी सुनावणी
कोल्हापूर, : मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिरोळ तालुक्यातील शिरटी व मजरेवाडी, पन्हाळा तालुक्यातील उंड्री, करवीर तालुक्यातील, कोगे व खुपीरे, भुदरगड तालुक्यातील फणसवाडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मंगळवार, ९फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. या ६ ग्रामपंचायतीच्या याचिकाकर्त्यांनी सुनावणीसाठी उपस्थित रहावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
सरपंच पदाचे आरक्षण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३० (५) व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील नियमानुसार तालुकानिहाय काढण्यात आले असल्याने मा. उच्च न्यायालयाचे ५ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आदेशाप्रमाणे शिरोळ, पन्हाळा,करवीर व भुदगरड तालुक्यातील ९ फेब्रुवारी रोजी सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडी १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत रोखून ठेवण्यात येत आहेत.
तसेच या तालुक्यांव्यतिरिक्त शाहूवाडी, हातकणंगले, राधानगरी, कागल, गगनबावडा, आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सरपंच व उपसरपंच निवडी यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशानुसार पार पाडण्यात याव्यात, असे ही जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमुद केले आहे.
युवा मराठा न्युज नेटवर्क .