Home आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअपची नवीन पॉलिसी

व्हॉट्सअपची नवीन पॉलिसी

135
0

राजेंद्र पाटील राऊत

व्हॉट्सअपची नवीन पॉलिसी                                                   (विशेष लेख युवा मराठा न्युज नेटवर्क)

सोशल मीडिया जायंट असलेल्या व्हॉट्सअपने आपली नवीन टर्म्स अँड प्रायव्हसी पॉलिसी जाहीर करून करोडो वापरकर्त्यांना धक्का दिलाय. आम्ही सांगतो ते मान्य करा, अथवा अकाउंट डिलिट करू अशी गोड भाषेत धमकी दिल्याने वादळ उठले आहे. याशिवाय या प्रायव्हसी पॉलिसीमुळे आपला डेटा आता सुरक्षित अस ल का अशी वापरकर्त्यांना चिंता वाटते आहे. कित्येकांनी व्हॉट्सअपला कायमचा राम राम ठोकून टेलिग्राम किंवा सिग्नल वर शिफ्ट होण्याची तयारी केली आहे. खरंच हे भीतीदायक चित्र आहे का? चला तर मग जाणून घेऊया…

आधी आपण व्हॉट्सअपची नवीन पॉलिसी नक्की काय आहे ते समजून घेऊ.

आतापर्यंत आम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवतो असा दावा करणाऱ्या व्हॉट्सअपने नवीन प्रायव्हसी पॉलिसीनुसार वापरकर्त्यांचा डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर करण्याचे ठरवले आहे. आता हा डेटा म्हणजे कोणता? तर आपले नाव, आपला नंबर, आपला डीपी, लोकेशन, आपले आर्थिक व्यवहार, एकमेकांना दिलेले पत्ते, शेअर केलेले व्हिडीओ, कॉन्टॅक्टस, आपली राजकीय मते, ज्या ग्रुपमध्ये आहोत त्या ग्रुपची माहिती, त्या ग्रुपची मानसिकता, आपला आयपी एड्रेस… सगळंच!

हा आपला पर्सनल डेटा मिळवून फेसबुक नक्की काय करणार?

फेसबुकने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकत घेऊन या तिन्ही कंपन्यांना एकाच छताखाली आणलंय. या तिन्हीवरचा डेटा जमा करण्यासाठी डेटा सेंटर्स उभारली आहेत. या डेटाचा उपयोग टार्गेटेड ऍडव्हरटाइजिंग आणि पॉलिटिकल कॅम्पेनसाठी केला जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही व्हॉट्सअपवर कुणासोबत लॅपटॉपविषयी चर्चा कराल तर तुम्हाला फेसबुक लॅपटॉपच्या जाहिराती दाखवायला सुरुवात करेल. व्हॉट्सअपने नुकतेच स्वतःचे UPI व्हॉट्सअप पेमेंट लाँच केले आहे. त्यावर होणाऱ्या व्यवहारावर सुद्धा बारीक नजर असेल.

जर तुम्ही एखाद्या पक्षाचे समर्थक असाल तर निवडणुकीच्या प्रचारात तुम्हाला टारगेट करून प्रचार केला जाईल. अधिक विस्ताराने सांगायचं तर समजा मी ‘अबक’ पक्षाचा समर्थक आहे आणि माझ्या मतदारसंघातील ‘अबक’ पक्षाचा उमेदवार सोशल मीडियावर स्पॉन्सर्ड कॅम्पेन करत असेल तर फेसबुक त्याची जाहिरात आधी मला दाखवेल. मी त्याला सकारात्मक प्रतिसाद देईन. या माझ्यासारख्या अनेकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे उमेदवाराची कॅम्पेन सफल होईल आणि फेसबुकलाही पैसा मिळेल. काही वेळा हे उलट पण होऊ शकतं. आपली राजकीय मते बदलण्यासाठी विरुद्ध बाजूच्या उमेदवाराच्या जाहिरातीचा भडिमार आपल्यावर केला जाऊ शकतो. जो पक्ष जास्त पैसा देईल, फेसबुक त्याचं! बरं, इथपर्यंत ठीक आहे, पण हा डेटा जर फेसबुक तिसऱ्याच कंपनीला विकत असेल तर ते जास्त भयानक असेल.

व्हॉट्सअप साठी टेलिग्राम/सिग्नल हा पर्याय आहे?

हे तर जास्त रिस्की असणार आहे. व्हॉट्सअपचा डेटा सध्या फक्त मालक कंपनी असणाऱ्या फेसबुककडे जातोय. पण टेलिग्राम हे ओपन सोर्स ऍप असल्याने यावरचा डेटा कुठेही जाऊ शकतो. त्याचा कुणीही गैरवापर करू शकतो. टेलिग्राम ही मुळात रशियन कंपनी होती. तिने आपले बस्तान नंतर बर्लिनला हलवले, नंतर व्हाया इंग्लंड ती आता दुबईला स्थित आहे. टेलिग्रामचे सर्व्हर्स सध्या दुबईमध्ये आहेत. आणखी एक पर्याय सिग्नल या ऍपचा सांगितला जातो. या ऍपची निर्मिती ऍक्टन नावाच्या व्यक्तीने केली आहे. हा ऍक्टन म्हणजे व्हॉट्सअपचा सहसंस्थापक. फेसबुकने व्हॉट्सअप विकत घेतले तेव्हा हा राजीनामा देऊन बाहेर पडला होता. सिग्नल हे ऍप तुलनेने अत्यंत नवखे असल्याने त्यांच्या पॉलिसी कश्या असतील ते आज सांगता येणार नाही. थोडक्यात, व्हॉट्सअप सोडून दुसरीकडे जाणे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे आहे.

मग आता करायचं तरी काय?

लक्षात घ्या, सध्याच्या युगात प्रायव्हेट असं काहीही राहिलेलं नाही. तुम्ही ज्या ज्या साईटवर जाता तिथे तिथे तुमचा डेटा गोळा केला जातो. तुम्ही जे जे ऍप वापरता तिथेही तुमचा डेटा गोळा केला जातो. जस्ट डायल, इंडियामार्ट यासारख्या साईटवर रजिस्टर करताय? त्यावर रजिस्टर केलेल्या प्रत्येकाचा डेटा मार्केट मध्ये उपलब्ध आहे. नौकरी डॉट कॉम वर रिझ्युम अपलोड करताय? त्या प्रत्येक कॅण्डीडेटचा डेटा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ट्रु कॉलर वापरत असाल तर तुमच्या नंबरसकट तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येकाचा नंबरचा डेटा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे सगळे लपून डेटा गोळा करतात आणि विकतात. फरक एवढाच की, व्हॉट्सअप हे राजरोसपणे सांगून करत आहे. शक्यतो आपली अत्यंत वैयक्तिक माहिती व्हॉट्सअप चॅट मध्ये देणे टाळावे हाच सध्या तरी एकमेव उपाय. जर फारच भीती वाटत असेल तर इंटरनेटचा वापर पूर्णपणे बंद करणे हा शेवटचा पर्याय!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here