राजेंद्र पाटील राऊत
पुणे शहराचे नामांतर करुन पुण्याला ‘जिजापूर’ असे नाव द्या,
संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे
औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या ५ वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना प्रमुख हेच राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.
आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय.
त्यामुळे त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे मंत्री थोरातांनी ठामपणे सांगितंल आहे.
या मागणी नंतर आता पुण्याचे देखील नामांतर करण्यात यावे हि मागणी जोर धरू लागली आहे. संभाजी ब्रिगेडने नामांतरासंदर्भातच आपली जुनी मागणी पुढे रेटली आहे. त्यांनी पुणे शहराचे नामांतर करुन पुण्याला ‘जिजापूर’ असे नाव द्या, अशी मागणी केली आहे. याबाबत बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे की, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायला वेळ लागत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराक झालेल्या पुणेला वसवलं. त्या पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे ‘जिजापूर’ असे नामांतर करून टाका. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, शिवनेरी पासून लाल महाल पर्यंत आणि पुरंदर पासून तोरणा, राजगड, सिंहगड, विसापूर, लोहगड, राजमाची, विचित्रगड ते स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पर्यंत सह्याद्री ओरडून ओरडून कर्तुत्व आणि पराक्रमाचा इतिहास सांगत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आपला पुणे जिल्हा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे. पुण्यात राष्ट्रमाता जिजाऊंनी बाल शिवबा’ला घेऊन सोन्याचा नांगर चालून पुणे वसवलं, त्या पुण्याचं आज सोनं झालेले आहे. घडलं ते रयतेच स्वराज्य.
नामांतराचे राजकारण करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका. मा. थोरात साहेब, टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार आणि पचणार नाही, आमचा वारसा आम्हाला अजून गौरवपुर्वक चालवू द्या. म्हणून पुण्याला ‘जिजापुर’ हे नाव द्या, असं म्हणत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी ही मागणी केली आहे.
युवा मराठा न्युज नेटवर्क .