Home Breaking News 🛑 *सातारा ५ लाख ७० हजाराचा महासागर परत करणारा प्रशांत* 🛑

🛑 *सातारा ५ लाख ७० हजाराचा महासागर परत करणारा प्रशांत* 🛑

125
0

🛑 *सातारा ५ लाख ७० हजाराचा महासागर परत करणारा प्रशांत* 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

सातारा :⭕ शेजाऱ्यावर विश्वास ठेवणं कठीण गोष्ट वाटू लागली आणि कुलपाच्या आतली तिजोरी सुद्धा भरदिवसा फुटू लागली. ‘घावंल त्याला पावंल’ ही स्टाईल सगळीकडे फेमस झाली. हॉटेलमधल्या टेबलावर विसरलेला मोबाईल दोन मिनिटात गायब होऊ लागला. रात्री घराबाहेर लावलेल्या गाडीतील पेट्रोलचा पत्ताच सकाळी कट होऊ लागला. वातावरण पार बिघडलं असं लोकांना वाटायला लागलं.

पण सांगली जिल्ह्यातल्या सांडगेवाडीचा एक तरुण मात्र याला अपवाद ठरला. रस्त्यावर सापडलेली पाच लाख सत्तर हजार रुपये रकमेची पिशवी प्रामाणिकपणे परत करणारा तो तरुण होता…

प्रशांत विजय सकट.
प्रशांतचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पाचवड. प्रशांतचे पणजोबा विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या तमाशात काम करत होते. प्रशांतचे आजोबा कलाकार गोळा करून बैलगाडीतून जाऊन गावोगावी फिरून तमाशा करत होते. कलेचा वारसा लाभलेल्या या कुटुंबात प्रशांतचा जन्म झाला. प्रशांतचे वडील सुद्धा सूर्यकांत-चंद्रकांत फलटणकर यांच्या तमाशात उत्कृष्ट ढोलकीपटू म्हणून काम करत होते. पण गावी सतत दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे नोकरीधंद्यासाठी त्यांनी गाव सोडले व आपल्या बहिणीच्या गावी म्हणजे पलूस तालुक्यातील दुधोंडी या गावी राहायला आले. प्रशांत बालपणापासून खूप हुशार होता. दहावीत त्याला 83 टक्के गुण मिळाले होते तर बारावीला तो विज्ञान शाखेत शिकत होता. गणित आणि इंग्रजीची त्याला लय आवड होती. त्याकाळी अस्खलित इंग्रजी बोलणारा वर्गात तोच एकटा होता. पण जगण्यासाठी माणसाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. प्रशांतच्या कुटुंबाने सुद्धा अशा अनेक गोष्टींचा त्याग केला व पोटापाण्यासाठी ते दुधोंडीला आले. प्रशांतचे शिक्षण सुटले. त्याचे वडील किर्लोस्कर कंपनीत कामाला जाऊ लागले. तो सुद्धा वडिलांसोबत फॅब्रिकेशनची कामे करू लागला. कष्ट करून हे कुटुंब पोट भरायला लागले. प्रशांत मात्र आपल्या स्वप्नांसोबत जगू लागला.

लहान असल्यापासून प्रशांत टुरिंग टॉकीजमध्ये ऑपरेटिंगचं काम करत होता. पलूसमध्ये आल्यानंतर त्याने शिवशंकर थिएटर मध्ये काही वर्षे ऑपरेटर म्हणून काम केलं. तो रोज पडद्यावर सिनेमा पाहायचा पण परिस्थितीमुळे बायकापोरांना मात्र थिएटरमध्ये सिनेमा पाहता येत नव्हता. त्यामुळे आपल्या घरात स्वतःचंच छोटसं थेटर असावं असं त्याला सतत वाटत होतं. त्यानं त्याच्या छोट्याशा घरात तेही स्वप्न पूर्ण केलं आणि आपल्या पत्र्याच्या घरात त्यांनं प्रोजेक्टर बसवला. आता मोठ्या पडद्यावर आपल्या कुटुंबाला तो सिनेमा दाखवू लागला. प्रामाणिकपणे कष्ट करत या कुटुंबाची धडपड सुरुच होती. प्रशांतची बायको आशा वर्कर आहे. तीही प्रशांतला नेहमी साथ देत होती. प्रशांत आपल्या मुलांवर कलेचा वारसा असणाऱ्या आपल्या कुटुंबाचे संस्कार करत होता. त्याने घरीच अनेक वाद्यं विकत घेतली होती. बालपणापासून मुलांना पियानो, ढोलकी, ढोलक वाजवायला तो शिकवत होता आणि आपला सांस्कृतिक वारसा जपत होता.

परवा दुपारी प्रशांत जेवायला घरी येत असताना वाटेत त्याला अचानक कापडाची एक बंद तुटलेली पिशवी पडलेली दिसली. पिशवीत काहितरी आहे, असं त्याला वाटलं म्हणून त्यांनं त्या पिशवीचं तोंड उघडलं आणि त्याला कळायचेच बंद झालं. दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल त्या पिशवीत होते. एवढी रक्कम त्यांनं उभ्या आयुष्यात कधीही पाहिली नव्हती. त्यामुळे त्याच्या श्वासांची गती वाढली. प्रशांतने ती पिशवी उचलली. घाबरलेल्या अवस्थेतच तो घरी आला आणि तासभर त्या पैशांचे बंडल मोजत बसला. ती एकूण रक्कम भरली पाच लाख सत्तर हजार रुपये. प्रशांतने काही वेळ विचार केला आणि व्हाट्सअप ला एक मेसेज सोडला. “पलूस ते सांडगेवाडी एमआयडीसी रोड वरती कोणाचे पैसे पडले असतील तर कॉल करा. ओळख पटवून पैसे घेऊन जाणे. रक्कम मोठी आहे.”

प्रशांतने मेसेजमध्ये रक्कम टाकलीच नव्हती. त्यामुळे या लबाड दुनियेतून त्याला ‘पैसे माझे आहेत’ असे अनेक फेक कॉल आले. पण त्या कॉलवर बोलली जात असलेली रक्कम आणि प्रशांतला सापडलेली रक्कम यात ताळमेळ लागत नव्हता. तेव्हा या छेलबाड दुनियेची प्रशांतला कीव येत होती. पैसे पडलेल्या माणसाच्या अवस्थेचा विचार करून प्रशांत अस्वस्थ होता. घड्याळाचे काटे फिरत होते. वेळ जात होता प्रशांत वाट पाहत होता. सहा वाजले आणि प्रशांतला देवराष्ट्रे वरून एक कॉल आला. त्या व्यक्तीने प्रशांतला सांगितलेली रक्कम, पिशवीचा कलर आणि पिशवीतील चिठ्ठीचे वर्णन तंतोतंत जुळले. तेव्हा प्रशांतने त्या व्यक्तीला घरी बोलावून घेतले. या दुनियेत प्रशांत सारखा माणूस आहे हे पाहून त्या 65 वर्षीय व्यक्तिला भरून आले. त्या व्यक्तीला रडू कोसळले. पैसे परत करताना ती व्यक्ती प्रशांतला दहा हजार रुपये बक्षिस म्हणून देऊ लागली. पण प्रशांतचे मन त्या पाच लाख सत्तर हजारावर गेले नाही तर दहा हजारावर कसे जाईल? प्रशांतने ते पैसे नाकारले व ती रक्कम ज्याची होती त्याला देऊन टाकली. प्रशांतचा हा प्रामाणिकपणा पाहून प्रशांतच्या वडिलांना जग जिंकल्याचा आनंद झाला. पलूस पोलीस निरीक्षक यांनी प्रशांतला बोलवून स्वतः त्याचा सत्कार केला.

आज पैशावरून लोकांचे खून पडतायत. नाती तुटतायत. सध्याच्या काळात पैसा मोठा झाला आहे आणि माणूस खोटा झाला आहे. अशा परिस्थितीत प्रशांत सारखा इमानदार माणूस जेव्हा समोर येतो तेव्हा माणुसकी जिवंत असल्याचा भास होतो. पाच लाख सत्तर हजार रुपये परत करणारा प्रशांत मला महासागरासारखा वाटू लागतो….⭕

Previous article🛑 पुण्याच्या अवती भवती कॉसमॉस फुलांचे जाळे 🛑
Next article🛑 खरे खोटे माहीत नाही पण खरे असेल तर कोपर्यापासून नमस्कार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here