५६ इंच छाती असेल, तर फक्त दोन ओळी टाका , भाजपमध्येही प्रवेश करेन; बच्चू कडू यांचं मोदींना आव्हान
प्रतिनिधी= किरण अहिरराव
मोदी सरकारनं अलिकडेच आणलेल्या तीन कृषी कायद्यावरून रणकंदन सुरू आहे. पंजाब, हरयाणासह देशातील विविध भागात शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहे. काँग्रेसकडूनही केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांवर टीका केली जात असतानाच राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिलं आहे. “मोदीजी आपली ५६ इंचची छाती असेल, तर शेतकऱ्यांसाठी दोन ओळी कृषी विधयेकात टाका,” असं कडू यांनी म्हटलं आहे.
शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आली होती.
ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर ही विधेयकं राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली. तिन्ही विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे. तर दुसरीकडे या तिन्ही कायद्यांबद्दलचा शेतकऱ्यांचा विरोध अजूनही मावळलेला नाही. पंजाब, हरयाणासह देशातील अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरू आहेत.
देशात कृषी कायद्यांना विरोध होत असताना राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनी बोलताना कृषी कायद्यांवर भूमिका मांडली. “कृषी कायद्यासंदर्भात शिवसेनेची भूमिका भाजपासोबत असतानाही याच पद्धतीनं होती. जिथं खरं होतं तिथं उभी राहिली. आमचं असं मत आहे की, बिलामध्ये दुरूस्ती करायला हवी. बिल जसंच्या तसं स्वीकारायला आम्ही तयार आहोत. मोदीजींची जर ५६ इंचची छाती असेल, तर ५६ इंच छाती स्वीकारतो. फक्त दोन ओळी त्यात टाका की, ५० टक्के नफा धरून भाव काढू आणि ५० टक्के नफा धरून जो भाव निघेल तशी खरेदी करू. इतक्या दोन ओळी टाका. गरज पडल्यास आम्ही भाजपात प्रवेश करू,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.