Home Breaking News *छत्रपती संभाजी महाराजांचे स्वीय सहाय्यक* *खंडो बल्लाळ यांचा स्मृतीदिन*

*छत्रपती संभाजी महाराजांचे स्वीय सहाय्यक* *खंडो बल्लाळ यांचा स्मृतीदिन*

93
0

*छत्रपती संभाजी महाराजांचे स्वीय सहाय्यक*
*खंडो बल्लाळ यांचा स्मृतीदिन*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

छत्रपती संभाजी महाराजांचे स्वीय सहाय्यक यांचा आज खंडो बल्लाळ चिटणीस यांचा तारखेप्रमाणे स्मृतिदिन (शके १६४८, अश्‍विन शु. ५). छ. शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेवेळी महाराष्ट्रातील सर्व जातीधर्माच्या अनेक घराण्यांनी अक्षरशः झोकून दिले होते. असेच एक घराणे म्हणजे चित्रे घराणे. चिटणिसीमुळे त्यांचे नाव चिटणीस झाले.
बाळाजी आवजी, नंतर त्यांचे चिरंजीव खंडो बल्लाळ व त्यानंतर त्यांचे चिरंजीव जिवाजी खंडो यांनाही चिटणीस पद मिळाले होते. रायगडावर विश्‍वासघाताच्या आरोपामुळे बाळाजी आवजी यांना देहदंड देण्यात आला होता. मात्र, त्यांचे चिरंजीव म्हणजेच खंडो बल्लाळ यांची छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचे स्वीय सहाय्यक (चिटणीस) म्हणून नेमणूक केली.
छ. संभाजी महाराज यांची ९ वर्षांची कारकीर्द अतिशय धकाधकीची होती. त्यावेळी दुष्काळही होता. त्यामुळे अस्मानी आणि सुलतानी आक्रमणांना तोंड देताना त्यांच्या साथीदारांनी दिलेले पाठबळ खूप महत्त्वाचे होते. चिटणीस पद म्हणजे राजेसाहेबांबरोबर सावलीसारखे राहायचे जणू एक व्रत होते. ते खंडो बल्लाळ यांनी छ. संभाजी महाराजांच्या अखेरपर्यंत सांभाळले. छ. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत नाशिक, कर्नाटक, जंजिरा व गोवा आदी मोहिमा पार पडल्या.
१६८३ मध्ये गोवा मोहिमेच्या वेळी मराठा सैन्यांनी जुवे बेटात जाऊन तेथील किल्ला काबीज केला. यावेळी पोर्तुगीज सैनिक तेथून पळाले व जाताना त्यांनी शेतकऱ्यांनी केलेले बांध फोडून टाकले. पोर्तुगीज सेनापती पळून जाऊ लागला तेव्हा संभाजीराजे यांनी घोडा खाडीतील पाण्यात घातला व ते पुढे जाऊ लागले पण नेमकी भरती सुरू झाली व घोडा पाण्यात बुडणार असे लक्षात येताच खंडो बल्लाळ यांनी पाण्यात उडी घेतली व महाराजांना सुखरूप बाहेर काढले.
छ. संभाजी महाराजांच्या निधनानंतर ते छ. राजाराम महाराज यांच्या सेवेत दाखल झाले. त्यावेळी राजाराम महाराज जिंजी किल्ल्यावर होते. राजाराम महाराज यांनीही त्यांना चिटणीसपदी नियुक्‍त केले. येथेही त्यांनी आपल्या मुत्सद्दीपणाची चुणूक दाखविली. जिंजी येथे मोगल सरदार झुल्फिकारखान याने वेढा घातला. या वेळी जिंजीचा वेढा सुमारे ८ वर्षे चालला; पण मराठ्यांचा पराक्रम व मुत्सद्देगिरी यामुळे मोगलांना जिंजी राजाराम महाराज यांच्यासह काबीज करण्यात यश आले नाही. या वेळी खंडो बल्लाळ यांनी गुप्तपणे मुघल छावणीतील गणोजी शिर्केंसह मराठा सरदारांची गाठ घेतली.
मुघल नाकेबंदीपासून राजाराम महाराज यांच्या सुटकेला मदत करण्यासाठी शिर्के यांना प्रवृत्त केले. गणोजींनी यावेळी काही अटी घातल्या व सहकार्याचे आश्‍वासन दिले. गणोजींनी दाभोळच्या वतनाची मागणी केली. हे वतन स्वत: खंडो बल्लाळ यांच्या मालकीचे होते. खंडो बल्लाळ यांनी लगेचच वतनाचे दानपत्र गणोजींना करून दिले.
छत्रपती राजारामांच्या मृत्यूपर्यंत खंडो बल्लाळ यांनी त्यांचे वैयक्‍तिक सहाय्यक म्हणूनच नव्हे तर विश्‍वासू सल्लागार म्हणून काम केले. राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर खंडो बल्लाळ यांना १७०७ पर्यंत महाराणी ताराबाईंनी त्यांच्या पदावर कायम ठेवले.
१७०७ मध्ये औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाला. त्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली. तेव्हा शाहू महाराजांनी खंडो बल्लाळ यांना आपले वैयक्‍तिक सहाय्यक म्हणून जबाबदारी सोपविली. या वेळी परशुराम पंतप्रतिनिधी व शाहू महाराज यांच्यातील मतभेद दूर करण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा मृत्यू १७१२ मध्ये झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here