• Home
  • *राज्यात माझे कुटुंब,माझी जबाबदारी ही मोहीम*

*राज्यात माझे कुटुंब,माझी जबाबदारी ही मोहीम*

*राज्यात माझे कुटुंब,माझी जबाबदारी ही मोहीम*▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज
करोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले.
या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक राज्यातील २ कोटी २५ लाख कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन ताप आणि प्राणवायू (ऑक्सिजन) तपासणार आहेत. तसेच लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, संशयित करोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, लठ्ठपणा यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचा समावेश आहे.
ही मोहीम पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर, तर दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
एका महिन्याच्या कालावधीत दोन वेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. ग्रामपंचाय ते महानगरपालिकेपर्यंत लोकप्रतिनिधींच्या सहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विविध संस्थांमार्फत ही बक्षीस योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

anews Banner

Leave A Comment