• Home
  • भांडवलाची गरज ; चार बँका करणार हा उपाय 🛑

भांडवलाची गरज ; चार बँका करणार हा उपाय 🛑

🛑 भांडवलाची गरज ; चार बँका करणार हा उपाय 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 26 ऑगस्ट : ⭕ चालू आर्थिक वर्षामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील चार बँका आपल्या समभागांची विक्री करून भांडवलामध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. समभाग विक्री करणाऱ्या बँकांमध्ये प्रामुख्याने स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

करोना विषाणूचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता बँका आपल्या निधीमध्ये वाढ करू इच्छित आहेत. मर्चंट बँकिंगशी संबंधित बँका निधी गोळा करण्यासाठी दुसऱ्या तिमाहीच्या निकालांची वाट पाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर वरील बँका समभागविक्रीचा निर्णय घेणार आहेत. या बँका लवकरच पात्र संस्थागत गुंतवणूकदारांना समभागांची विक्री करून आपली भांडवलाची गरज पूर्ण करण्याची शक्यता आहे.

उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळे कर्जांचे थकीत हप्ते वाढण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या अनुत्पादक कर्जांमुळे (एनपीए) बँकांच्या रेटिंगवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एकवेळच्या कर्ज पुनर्रचनेमुळे बँकांकडील कर्जे वाढलेली दिसणार आहेत.

पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन राव यांनी दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीत समभागविक्रीद्वारे निधी उभारण्याची आमची योजना आहे. तोपर्यंत बँकेतर्फे दोन्ही तिमाहींचे निकाल जाहीर होतील.

आतापर्यंत आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्र बँक या खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांसह अन्य बँकांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीमध्ये भांडवल उभारणी केली आहे. त्यासाठी त्यांना चांगला प्रतिसादही मिळाल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बहुसंख्य बँकांना चालू आर्थिक वर्षामध्ये रोखे (बाँड) आणि समभागांच्या विक्रीतून निधी उभारण्यासाठी समभागधारकांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या माध्यमातून स्टेट बँक २०,००० कोटी रुपये आणि पंजाब नॅशनल बँक ७,००० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.

भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदाने रोख्यांची विक्री करून अनुक्रमे ८,९३१ कोटी रुपये, ९९४ कोटी रुपये आणि ९८१ कोटी रुपयांचा निधी जमवला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment