दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता होणार जाहीर
प्रतिनिधी= किरण अहिरराव
कोल्हापूर – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल उद्या (ता.29) दुपारी एक वाजता जाहीर होत आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. कोरोनामुळे दहावीचा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला असला तरी त्याची विद्यार्थ्यांत उत्सुकता आहे.
यंदा कोरोनाच्या संचारबंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम उशीरा झाले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी निकाल जाहीर होतो. यंदा मात्र निकाल जाहीर करण्यासाठी जुलैचा शेवटचा आठवडा उजाडला आहे. कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागातून तब्बल 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
विद्यार्थ्यांना www.maharesult.nic.in वेबसाईटवरून निकालाची प्रत उपलब्ध होणार आहे. तसेच www.mahsscboard.in वेबसाईटवरून कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट, तर छायाप्रतीसाठी 18 ऑगस्टपर्यंत http://verification-ssc.ac.in वेबसाईटवर शाळांतर्फे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.