• Home
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला संवाद –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई,दि. २२ – महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसित करावी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.

राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कामातून भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला पुढे कसे नेता येईल याचा मार्ग दिसला पाहिजे. उत्पादनांना, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी त्याचे मार्केटिंग कसे करता येईल याचाही विचार व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संघटित शेती आणि संघटित शेतकरी ही संकल्पना राबवून जे विकले जाईल तेच पिकवायची गरज असून शेतकऱ्यांना संघटित करतांना विभागवार निश्चित केलेल्या दर्जाचीच पिके पिकतील, ती बाजारपेठेत विकली जातील यादृष्टीने शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करावे.

विभागवार पिके पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची सभासद नोंदणी शासनाकडे व्हावी, त्याला चांगले बियाणे, खते देऊन बळकटी देतांना बाजारपेठेची शाश्वती देण्याचे प्रयत्न व्हावेत. उत्पादन वाढले परंतू शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न झाला पाहिजे, शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे.

कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता दाखवावी तसेच कृषी विद्यापीठाच्या प्रयोगाचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा. प्रयोग फक्त प्रदर्शनात न राहता त्याची अंमलबजावणी व्हावी. निर्यातक्षम उत्पादने घेऊन स्थानिक बाजारपेठेत विकावीत. आपल्या लोकांनाही त्यामुळे उत्तम दर्जाचे अन्न मिळेल.

शेतीमध्ये ही दर्जोन्नती आणि सुधारणा खुप महत्वाची आहे. यातून शेतकरी स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. शेती आणि शेतमालासाठीही “गोल्डन अवर” महत्वाचा आहे. वेळेत शेतमालाची खरेदी आणि विक्री होणे गरजेचे आहे. नसता वाढीव किंमतीचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता व्यापाऱ्यांना मिळतो.

शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा. कोणताही उद्योजक कुठेही गुंतवणूक करतांना आधी मार्केट सर्व्हे करतो. तसेच शेतीचे ही आहे. शेतीतही मार्केट सर्व्हे अत्यंत गरजेचा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.

anews Banner

Leave A Comment