दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखा ठरल्या
मुंबई : जुलै महिन्यापासून नववी, दहावी आणि बारावीच्या वर्गांना प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल. जुलैमध्ये शाळेचे वर्ग सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची पूर्ण तयारी असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच या बैठकीत दहावी-बारावीच्या निकालाबाबतच्या संभाव्य तारखांबाबतही माहिती देण्यात आली. (CM Uddhav Thackeray Meeting )
नुकतंच शालेय शिक्षण विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शालेय शिक्षण, दहावी-बारावी निकाल, अकरावी प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन शिक्षण याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
दहावी-बारावी निकालाची प्रक्रिया वेगाने सुरु
यंदा मार्च 20 च्या दहावी परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 आणि बारावीसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
बारावीचे सर्व पेपर कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते. मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार येत्या 15 जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावू, असे सांगितले. कोरोना काळात 97 टक्के उत्तरपत्रिका या परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंग ही वेगाने सुरु आहे, अशी माहिती दिली.
११ वी प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबवा
दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल ॲप अशा सुविधा देण्यात येत आहेत. १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल अशी माहिती यावेळी विभागाने दिली.
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.