Home Breaking News खेड मधील शेतकर्‍यांचा नाव प्रयोग! ✍️ रत्नागिरी ( विजय पवार महाराष्ट्र...

खेड मधील शेतकर्‍यांचा नाव प्रयोग! ✍️ रत्नागिरी ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

131
0

🛑 खेड मधील शेतकर्‍यांचा नाव प्रयोग! 🛑
✍️ रत्नागिरी ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड :(पोसरे) ⭕कोकणातील भातशेती ही प्रामुख्याने पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असते. पाऊस चांगला पडला तर ठिक नाहीतर लावणी कशी उरकायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो मात्र तालुक्यातील पोसरे गावातील सडेवाडी येथील ग्रामस्थांनी पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन न राहता सार्वजनिक साठवण टाकीतील पाण्याचा वापर करून सामुदायीक शेती पिकवण्याचा नवा पायंडा पाडला आहे.
सडेवाडीतील ग्रामस्थांच्या शेतीबाबतच्या या प्रयोगाचे कौतुक होत आहे.

सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेले पोसरे हे गाव तसे दुर्गमच. या गावातील सडेवाडी येथे 12 कुटुंब असून या वाडीची लोकसंख्या जवळपास ४५ च्या आसपास आहे. या गावातील शेतकरी देखील काल-परवा पर्यंत पावसाच्या लहरीपणावरच अवलंबून होते. पाऊस चांगला झाला तर वेळेत लावणी उरकत होते नाहीतर अन्य शेतकऱ्यांप्रमाणेच शेताच्या बांधावर बसून पावसाची वाट पहात होते. मात्र आता या वाडीने शेतीमध्ये क्रांन्ती केली आहे.

शेती पिकवण्यासाठी पाणी हा महत्वाचा घटक असल्याने त्यांनी सर्वप्रथम पावसाचे वाया जाणारे पाणी अडवण्यास सुरुवात केली. लोटे येथील एक्सल इंडस्ट्रिज या कंपनीचे स्वामी विवेकानंद रिसर्च सेंटर आणि जलनायक राहुल तिवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ७०० मीटर उंच डोंगरावर असणारे झरे एकत्र करून भूमिगत बंधारा आणि हौद बांधण्यात आला. त्यानंतर जलवर्धिनी प्रतिष्ठानचे उल्हास परांजपे यांच्या माध्यमातून २५ हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेली फेरोसिमेंटची टाकी आणि त्या व्यतिरिक्त ३००० लिटर साठवण क्षमता असलेल्या दहा साठवण टाक्याही बसविण्या आल्या. 25 मे ला रोहिणी नक्षत्र निघाल्यावर येथील शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या पेरणी केली. त्यानंतर पावसाची वाट न पाहता साठवण टाक्यांमध्ये साठवून ठेवलेले पाणी शेतीला देण्यास सुरवात केली. . काही दिवसातच पेरलेली शेती लावणी योग्य झाल्याने त्याच पाण्याचा वापर करत लावणीला सुरवातही करण्यात आली.
गेले दोन दिवस पावसाने दडी मारली असल्याने अद्याप तालुक्यात कुठेही लावणीला सुरुवात झालेली नाही. तालुक्यातील अन्य शेतकरी अद्याप लावणीपूर्व मशागतीच्या कामातच गुंतले आहेत. मात्र शेतीची वेगळी वाट अबलंबलेल्या सडेवाडीतील शेतकऱ्यांनी लावणीला सुरवात देखील केली आहे. नैसर्गिक स्त्रोत एकत्र करून तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यात आणि साठवण टाकीत मुबलक पाणी असल्याने लावणीसाठी शेतकऱ्यांना पावसाची वाट पहात बसण्याची गरजच उरली नाही. शिवाय सामुदायिक शेती केली जात असल्याने गावातील शेतकऱ्यांचे अनेक हात एकत्र आले आहेत. त्यामुळे श्रम आणि वेळेचीही बचत होऊ लागली आहे.

सडेवाडीतील ग्रामस्थांनी भात शेतीव्यतिरिक्त हळद आणि सुरणाचे पिक देखील घ्यायला सुरवात केली असल्याने या वाडीतील शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ होवू लागला आहे. सडेवाडीतील शेतकऱ्यांनी साठवण टाकीतील पाण्यावर सामुदायिक शेती करण्याचा घेतलेला निर्णय हा कोकणातील शेतकऱ्यांसाठी आदर्शवत असल्याने कोकणातील अन्य शेतक-यांनी शेतीच्या हृद-बांधोरीवरून एकमेकांशी वादीवाद करत बसण्यापेक्षा सडेवाडीतील शेतकऱ्यांनी चोखळलेल्या वेगळ्या वाटेचा अवलंब केला तर कोकण सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही..⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here