Home Breaking News चीन सोबत झालेल्या चकमकीत भारतीचे २० जवान शहीद, तर ४३ चिनी सैनिकाना...

चीन सोबत झालेल्या चकमकीत भारतीचे २० जवान शहीद, तर ४३ चिनी सैनिकाना ठार केल्याची माहिती

113
0

चीन सोबत झालेल्या चकमकीत भारतीचे २० जवान शहीद, तर ४३ चिनी सैनिकाना ठार केल्याची माहिती
____________*____________

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
_____________*___________

दि. १७ – पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात चकमक झाल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव असताना मोठी माहिती समोर आली आहे. चीनसोबत झालेल्या चकमकीत जवळपास २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे. याआधी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती. सरकारी सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

२० जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला भारतीय लष्करानेही दुजोरा दिला आहे. चकमकीत जखमी झालेले १७ जवानदेखील शहीद झाल्याने एकूण संख्या २० झाल्याचं भारतीय लष्कराने सांगितलं आहे.

दरम्यान या चकमकीत चीनचंही नुकसान झालं आहे. चीनचे जवानही मृत्यूमुखी पडलेले असून गंभीर जखमी झाले आहेत. सुत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ही संख्या ४३ इतकी आहे.

भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सोमवारी रात्री हिंसक चकमक झाली. यावेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचं भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितलं आहे. पण यावेळी दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचं नुकसान झालं असल्याचं समोर येत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितलं आहे –

चीनने भारतीय सैन्यांनी वास्तविक नियंत्रण रेखा पार करुन दोन वेळा आपल्या सैन्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान भारताकडूनही परराष्ट्र मंत्रालयानेही संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला असून चीनकडून वास्तविक नियंत्रण रेखा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “१५ जूनच्या रात्री चीनकडून एकतर्फीपणे वास्तविक नियंत्रण रेषेवरील सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही सैन्यांचं नुकसान झालं आहे जे टाळता आलं असतं. चीनकडून ६ जून रोजी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर तसंच वाद कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी झालेल्या सहमतीचं उल्लंघन करण्यात आलं”.

“सीमा परिसरात शांतता नांदली पाहिजे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला पाहिजे या भूमिकेवर आम्ही अद्यपही ठाम आहोत. पण याचवेळी भारताचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी कटीबद्ध आहोत,” असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

सीमा व्यवस्थापनाकडे एक जबाबदार देश म्हणून पाहताना भारत वास्तविक नियंत्रण रेषेच्या आतमध्ये राहूनच हालचाल करणार हे स्पष्ट आहे. चीनकडूनही आम्ही तशीच अपेक्षा करत आहोत असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here