• Home
  • वरळीच्या डोम सेंटरमध्ये ‘या’ देशातील करोना रुग्णावरही उपचार

वरळीच्या डोम सेंटरमध्ये ‘या’ देशातील करोना रुग्णावरही उपचार

🛑 वरळीच्या डोम सेंटरमध्ये ‘या’ देशातील करोना रुग्णावरही उपचार 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 13 जून : ⭕ वरळीच्या एनएससीआय डोम सेंटरमध्ये परळच्या टाटा रुग्णालयातील कर्करोग आणि करोना या दोन्ही आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांवर उपाचर सुरू आहेत. या डोम सेंटरमध्ये १७६ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून आतापर्यंत १२६ रुग्ण करोनाने बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांमध्ये आसाम, त्रिपुरापासून ते बांगलादेशातील रुग्णांचाही समावेश आहे.

वरळीच्या या डोम सेंटरमध्ये महाराष्ट्रातील ९२ रुग्ण होते. त्यापैकी ६६ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेशातील १८ पैकी १४, पश्चिम बंगालमधील २६ पैकी १६, बिहारमधील २१ पैकी १२, झारखंडमधील १० पैकी ९, गोवा आणि तामिळनाडूतील प्रत्येकी एक, आसाम आणि त्रिपुरातील प्रत्येकी दोन, छत्तीसगडमधील दोनपैकी एका, मध्यप्रदेशातील दोघा आणि बांगलादेशातील एका रुग्णावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे करोनासह कर्करोगाशीही झुंज देत आहेत.

या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती स्वाभाविकच खालावलेली असते. त्यात कोरोनाचीदेखील लागण झाल्यास त्यांच्या जीविताला धोका पोहोचू नये, यासाठी महापालिकेने टाटा रुग्णालयाला मदतीचा हात दिला आहे. तेथील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत, असं पालिकेने म्हटलंय.

टाटा रुग्णालयातून डोम करोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या २ वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते ७७ वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे. देशातील जवळपास सर्व भागातून आलेल्या रुग्णांसह एक विदेशी नागरिकही त्यात आहे. दाखल रुग्णांपैकी बहुतांश हे ५० वर्ष वयावरील आहेत. आतापर्यंत एकूण १७६ कोरोना बाधित कर्करुग्ण डोम कोरोना केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल झाले. पैकी १२६ जणांना यशस्वी उपचार देऊन, करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. यामध्ये एका विदेशी नागरिकाचाही समावेश आहे. तर ५२ जणांवर उपचार सुरु आहेत. यातील लक्षणीय बाब अशी की, यातील एकही रुग्ण सुदैवाने दगावला नसून ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे, असं पालिकेने स्पष्ट केलं.

एकाही रुग्णाचा मृत्यू नाही.

या डोम करोना केंद्रामध्ये रुग्णांच्या १० नातेवाईकांवर देखील यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले असून ४ नातेवाईकांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहितीही पालिकेने दिली.⭕

anews Banner

Leave A Comment