• Home
  • रुग्णसेवेचे समाधान अमूल्य

रुग्णसेवेचे समाधान अमूल्य

🛑 रुग्णसेवेचे समाधान अमूल्य🛑
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे पिंपरी-चिंचवड : ⭕ ‘वैद्यकीय अधिकारी म्हणून गेल्या तीन महिन्यांत एकदाही सुट्टी न घेता सेवाभावी वृत्तीने योगदान दिले. त्याचे फलित म्हणजे रुग्णाच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधान हेच होय,’ असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे-वालावलकर यांनी सांगितले.

शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजपर्यंत अखंडपणे दिवसातील अठरा ते वीस तास काम करून डॉ. डांगे यांनी संकटकाळात महत्त्वाचे योगदान दिले आहे. कर्तव्य आणि सेवाभावी वृत्तीने केलेल्या कामाचा गर्व न बाळगता त्या सतत व्यग्र असतात. करोनाबाधित रुग्णांच्या घरी सर्वेक्षण, त्यांच्या कुटुंबीयांचे प्रशिक्षण, नोंदी ठेवणे, दैनंदिन अहवाल सादर करणे, वरिष्ठांना रिपोर्टिंग करणे आदी अनेक प्रकारची कामे त्या न थकता करीत आहेत.

स्त्रीरोगतज्ज्ञ, कुटुंब कल्याण कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान प्रमुख आदी जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या डॉ. डांगे यांची मार्च महिन्यापासून करोना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. तेव्हापासून त्यांनी गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत एकदाही सुट्टी घेतली नाही. दिवसातून सलग १८ ते २० तास त्या कार्यरत असतात. करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या घराचे आणि परिसराचे सर्वेक्षण करून क्षेत्रीय कर्मचारी, आशा आणि अंगणवाडी सेविका यांना त्या मार्गदर्शन करतात. रुग्णांचे नातेवाइक, मित्र तसेच त्यांचा कामानिमित्त संपर्क आलेल्या व्यक्तींशी त्या संवाद साधून काय काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करीत असतात. त्यांचे वेळीच विलगीकरण करून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी त्या मेहनत घेतात.

आत्तापर्यंत सुमारे चारशेंहून अधिक रुग्णांच्या नातेवाइकांना हाताळण्याचे आव्हान त्यांनी पेलले आहे.

आणीबाणीच्या काळात काम करताना कुटुंबांनी दिलेली साथ अतिशय मोलाची असते. त्यामुळे पती, सासू, आई आणि मुलगी यांच्याविषयी डॉ. डांगे कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. त्यांच्या सहकार्यामुळेच आपण समाजासाठी वेळ देऊ शकलो, असे त्यांनी नमूद केले. ‘पालिकेचा स्टाफ, नर्सेस यांचे योगदानही मोलाचे ठरले. विशेष म्हणजे या कालावधीत खासगी वैद्यकीय संघटनेने केलेले सहकार्य उल्लेखनीय म्हणता येईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

या कालावधीतील अनुभवाविषयी डॉ. डांगे म्हणाल्या, ‘करोनामुळे माणसांतील जाती आणि धर्मभेदाची बंधने तुटून गेली आहेत. माणुसकीच्या नात्याची जपणूक झाली. करोनातून बरे झाल्यावर तुमचे अनुभव इतरांसाठी शेअर कराल का, अशी आमची विनंती एका रुग्णाने हसतमुखाने मान्य केली. हा माझ्या दृष्टीने चांगला अनुभव म्हणता येईल. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरात आले. उपजीविका करीत गुण्यागोविंदाने एकत्र राहिले. शहराच्या विकासात हातभार लावला. परंतु, लॉकडाउनच्या काळात अनेक जण या शहराकडे पाठ फिरवून गावी निघून गेले. ते का सोडून गेले, याची मात्र खंत वाटते.’

महापालिका प्रशासनावर विश्वास ठेवून उपचारांसाठी रुग्ण रुग्णालयात येतात आणि बरे होऊन घरी जातात. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधान ही आमच्या कामाची पावती असते. येथे श्रीमंत-गरीब असा कोणताही भेदभाव नाही. रुग्ण आणि डॉक्टर हे विश्वासाचे नाते निर्माण होते. यापेक्षा दुसरा कोणताही आनंद नाही.

➡️ डॉ. वर्षा डांगे-वालावलकर, महिला वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका⭕

anews Banner

Leave A Comment