• Home
  • मालाडकरांमध्ये संसर्ग पसरला कारण…

मालाडकरांमध्ये संसर्ग पसरला कारण…

🛑 मालाडकरांमध्ये संसर्ग पसरला कारण… 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 7 जून : ⭕ दिंडोशी व मालाड पश्चिम या विधानसभा क्षेत्र असलेल्या महापालिकेच्या पी-उत्तर विभागात सध्या करोनाबाधित रुग्ण वाढीचा दर वाढताना दिसत आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी या जी-दक्षिण विभागातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता कमी होत असतानाच शहराचे पालकमंत्री अस्लम शेख प्रतिनिधीत्व करत असलेल्या मालाड पश्चिम विधानसक्षा क्षेत्रासह पी-उत्तर विभागात झपाट्याने रुग्ण वाढताना दिसत आहेत. मात्र, जे स्थलांतरीत कामगार तसेच अन्य कुटुंबे गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बाहेर पडले त्यामुळे झालेल्या गर्दीतून या भागात पुन्हा एकदा संसर्ग झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पी-उत्तर विभागातील कोरोना रुग्णांची संख्या व क्रमवारी
*९ एप्रिल २०२० : ३८ (क्रमवारीत सहाव्या स्थानावर)
*१४ एप्रिल २०२० : ५८ (क्रमवारीत १३ व्या स्थानावर)
*२७ मे २०२० : १०४९ (क्रमवारीत १५व्या स्थानावर)
*३१ मे २०२० : १३८२ (क्रमवारीत १३ व्या स्थानावर)
*०४ जून २०२० : १८३९ (क्रमवारीत १३ व्या स्थानावर)

मालाडच्या पी- उत्तर विभाग रुग्णवाढीच्या यादीत १३ व्या क्रमांकावर आहे. सध्या या विभागात एकूण बाधित रुग्णांची संख्या १९०० वर पोहोचली आहे. तर यातील साडेचारशे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या अजूनही १४०० च्या वर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण वाढीचा सरासरी दर हा साडेतीन टक्के आहे. त्यातुलनेत या विभागात सध्या ७.४ टक्के एवढा रुग्णवाढीचा दर आहे. विशेष म्हणजे ९ एप्रिल रोजी पी-उत्तर विभागात रुग्ण संख्या ३८ होती आणि त्यावेळी २४ विभागांमध्ये हा विभाग ६ व्या क्रमांकावर होता. परंतु त्यानंतर येथील रुग्ण संख्या नियंत्रणात आणून १४ एप्रिल रोजी हा विभाग १३ व्या क्रमांकावर गेला. त्यावेळी या विभागात रुग्णांची संख्या ५८ होती. परंतु या विभागातील रुग्णवाढीचा दर वाढतच गेला असून ८ दिवसांमध्येच या विभागांमध्ये सुमारे ८०० रुग्णांची भर पडली आहे. म्हणजे सरासरी १०० रुग्ण मागील आठ ते दहा दिवसांपासून आढळून येत आहे.

सध्या कुरार आप्पापाडा, शिवाजीनगर-कोकणी पाडा, संतोष नगर, मालवणी गेट क्रमांक ७ आदी ठिकाणी जास्त रुग्ण आढळून येत आहेत. ३५ बाधित क्षेत्रांपैकी ५ मोकळे करण्यात आल्याने आता ३० बाधित क्षेत्रे आहेत. बहुतांशी विभाग झोपडपट्टी परिसर असल्याने दिवसाला सहा वेळा सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन केले जाते. लोकप्रतिनिधींचे सहकार्य तेवढेच असल्याने काम करणे सोपे जात आहे. अतिजोखमीच्या संपर्कातील संशयित रुग्णांसाठी २४०० खाटांची क्वारंटाईन क्षमता आहे.

ती आता ३ हजार पर्यंत वाढवली जात आहे. सध्या यामध्ये २२०० संशयित रुग्ण दाखल आहेत. तर लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना आयसोलेशन करण्यासाठी १००० खाटांची क्षमता आहे. त्यात सध्या २०० रुग्ण असल्याचे पी- उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी स्पष्ट केले. मागील दोन महिन्यांपासून या विभागात रुग्णवाढीचे प्रमाण त्याप्रमाणे नियंत्रणात होते. परंतु मागील आठ दिवसांमध्ये या विभागात रुग्णवाढीचे प्रमाणे सरासरीपेक्षा अधिक झालेले आहे. परंतु येथील परिस्थिती तशी आटोक्यातच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.⭕

anews Banner

Leave A Comment