🛑 अजोय मेहता यांची हॅट्रिक🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 5 जून : ⭕ कोविड-१९ आणि त्यानंतरच्या ’निसर्ग’ चक्रीवादळामुळे राज्याची प्रशासकीय व्यवस्था सध्या एका मागोमाग एक आव्हानांचा सामना करत आहे. असे असले तरी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मात्र आपले दिल्लीतील वजन वापरुन पुन्हा एकदा कार्यकाळ वाढवण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिसर्यांदा मेहतांना कार्यकाळ वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला पत्रं पाठवले आहे. अजोय मेहता यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर असलेली श्रद्धा पाहता ते तिसरी टर्म पदरात पाडून घेतील असे संकेत आहेत. मेहतांच्या संभाव्य हॅटट्रिकमुळे त्यांच्याच बॅचच्या अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. मेहता यांना तिसर्यांदा मुदतवाढ मिळाल्यास निवृत्तीनंतर सलग १ वर्षे मुख्य सचिव राहाण्याचा रेकॉर्ड होईल.
राज्याच्या प्रशासनात सध्या सर्वात ज्येष्ठ असलेले अजोय मेहता हे १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते सप्टेंबर २०१९ मध्ये सेवेतून निवृत्त झालेत. मात्र तोंडावर आलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. निवडणुकांनंतर सगळ्यांचे अंदाज चुकवलेल्या सत्तेच्या समीकरणात वरचढ ठरत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मेहता हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या खूपच जवळ असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच फडणवीस यांच्या अनिच्छेनंतरही मुख्य सचिव झाल्यावर ठाकरेंकडून दुसरी मुदतवाढ मिळवणे त्यांना कठीण जाईल, असे वाटत होते. मात्र करोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी मेहतांना तीन महिन्यांची दुसरी टर्म मिळाली ती येत्या ३० जूनला संपत आहे. नव्या अधिकार्याला कोविडच्या महामारीत प्रशासन हाताळताना अडचण येण्याची शक्यता असल्याने मेहतांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव दिल्लीला पाठवल्याचे खात्रीलायकरित्या समजते. मराठी बाण्याचा घोषा लावण्यात तरबेज असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी प्रशासकीय व्यवस्था आणि अधिकार्यांच्या नेमणुका यावर पूर्णत: अजोय मेहता आणि शरद पवार यांचाच वरचष्मा सध्या दिसत आहे.
राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त या महत्त्वाच्या पदांवर मेहतांनी अमराठी अधिकार्यांचीच वर्णी लागली आहे. त्यामुळे प्रशासकीय आणि पोलीस अधिकार्यांमध्ये मराठी-अमराठी अशी धुमस सध्या सुरु झाली आहे. करोना काळातील सगळे महत्त्वाचे निर्णय हे मेहतांच्या मर्जीनेच घेतले गेले. इतकेच काय पण प्रवीण परदेशींना हटवून त्यांच्या जागी १९८९च्या बॅचचे इकबाल सिंह चहल यांना आणण्याचा निर्णय हा पूर्णत: अजोय मेहता यांचा असल्याची चर्चा मंत्रालयात सुुरू आहे. त्यांच्याऐवजी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर किंवा भूषण गगराणी या मराठी अधिकार्यांपैकी एकाला बसवावे, अशी पालिकेच्या सत्तेतील शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना वाटत होते.
अजोय मेहता यांना दुसर्यांदा कार्यकाळ वाढवून मिळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाण्याआधी राज्यातील सुमारे २० सनदी अधिकार्यांनी मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अशाप्रकारे मुख्य सचिवांना मुदतवाढ दिल्यास मागून येणार्या अधिकार्यांवर अन्याय होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात आणून दिली. मात्र महाविकास आघाडीच्या सरकार मधले सगळेच नेते करोनाच्या संकटाने हादरून गेल्याने तीन महिन्यांची जून अखेरपर्यंतची दुसरी मुदतवाढ अजोय मेहतांना सहजगत्या मिळून गेली. प्रत्यक्षात देशातील करोनाच्या बळीं पैकी निम्म्याहून अधिक बळी हे एकट्या महाराष्ट्रातील तर त्यातील ६० टक्के बळी एकट्या मुंबईतीलच आहेत, याकडेही एका ज्येष्ठ सनदी अधिकार्याने आपलं महानगरशी बोलताना लक्ष वेधले.
मेहतांनी आपल्या मुठीत ठेवलेल्या प्रशासनात करोनाच्या काळात एकाच दिवसात तीन-तीन अध्यादेश बदलण्याची नामुष्की राज्यावर आलेली आहे. करोनाचे संकट एका रात्रीत संपूर्णतः जाणार नसल्यामुळे पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी अजोय मेहता यांना मुदतवाढ देऊ नये, असा एक मतप्रवाह मंत्रिमंडळातील विशेषता काँग्रेसच्या काही मंत्र्यांमध्ये दिसून येतोय. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची विशेष मर्जी असलेल्या मेहतांसमोर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक कॅबिनेट मंत्री ही निष्प्रभ ठरत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांवरही अजोय मेहता यांनी जी जादू केली आहे त्यावरुन त्यांची निवृत्तीनंतरची प्रशासनातली हॅट्रिक पूर्ण होणार याबाबत केवळ औपचारिकता बाकी आहे. निवृत्तीनंतर सलग एक वर्ष राज्याचे मुख्य सचिव राहाण्याचा रेकॉर्डही मेहतांच्याच नावावर लागेल, असेही अधिकार्यांचे मत आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार हे अजोय मेहतांच्याच १९८४च्या बॅचचे आहेत. मुळचे बिहारी असलेले संजय कुमार हेही अनुभवी आहेत. पण त्यांना मागील नऊ महिन्यांत मुख्य सचिव होण्याची संधी मिळालेली नाही. त्यांच्याकडे सध्या गृह विभागाचा कारभार असून ते एप्रिल २०२१ मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर ज्येष्ठतेमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास) प्रवीण परदेशी यांचा क्रमांक लागतो. ते १९८५ च्या बॅचचे असून त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आणि मुंबई महापालिका आयुक्तपद भुषविले आहे. परदेशी यांच्या पाठोपाठ १९८५च्याच बॅचचे मराठमोळे सीताराम कुंटे यांनाही मेहतांना मुदतवाढ दिल्यास फटका बसू शकतो. कुंटे हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव (सामान्य प्रशासन) पदी असून त्यांनीही मुंबई महापालिका आयुक्तपदाची धुरा सांभाळली आहे. कुंटे आणि परदेशी हे नोव्हेंबर २०२१ रोजी निवृत्त होणार आहेत.⭕
