• Home
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर, नुकसानीची पाहणी करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर, नुकसानीची पाहणी करणार

🛑 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर, नुकसानीची पाहणी करणार 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई / रायगड, 5 जून : ⭕निसर्ग चक्रीवादळाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हा रायगड जिल्ह्याला बसला आहे. नुकसान पाहणीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वत: पाहणी करण्यासाठी रायगडच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यानंतर ते कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात काही लाख घरांचे नुकसान झाले आहे. तर विजेचे हजारो खांब उन्मळून पडल्याने ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडीत आहे. दरम्यान, महावितरणने युद्धस्तरावर जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना अन्नधान्य पुरविण्याचे, तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर केल्यास शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरु करावा व प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून अधिक मनुष्यबळ, साधनसामुग्री उपलब्ध करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आढावा घेताना दिले आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगर विकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब हे देखील सहभागी झाले होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील सूचना केल्या.

चक्रीवादळाचा जोर ओसरला. आपल्याला आता सदैव दक्षता घ्यावी लागेल. महत्त्वाचा मुद्दा असा की, पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत पण आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला पहिल्यांदाच खूप वर्षांनी असे वादळ आले. त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारीही ठेवावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणालेत. रायगड निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी यावेळी माहिती दिली की, रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. १ लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. श्रीवर्धन आणि मुरुडच्या मध्ये चक्रीवादळ धडकले, त्याचा फटका श्रीवर्धनला जास्त बसला असून सर्व दळणवळण ठप्प झाले आहे. विजेचे खांब हजारोंच्या संख्येने पडले आहेत.

रायगड जिल्ह्यांत ५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पंचनाम्यासाठी पथके बाहेर पडली आहेत. मात्र अंतर्गत रस्ते खूप खराब झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णवाहिकाही पाठवणे शक्य झालेले नाही. लोकांत दूरध्वनी व मोबाईल सेवा खंडीत झाल्याने ते घाबरले आहेत, त्यांना इतरांशी संपर्क शक्य होत नाही. टेलिकॉम यंत्रणा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वीज नसल्याने ५०० मोबाईल टॉवर पडले आहेत असे सांगण्यात आले. १० बोटी अंशत: नुकसान झाले असून १२ हेक्टर मत्स्यशेती खराब झाली आहे, अशी माहितीही देण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. यात दापोली, मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. ३ हजार झाडे पडली आहेत. १४ सबस्टेशन, १९६२ ट्रान्सफॉर्मर विजेचे खांब पडले आहेत, पाणीपुरवठ्याची व्यवस्था काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे, अशी माहिती रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.⭕

anews Banner

Leave A Comment