• Home
  • रेशनकार्ड नसलेल्यांना मिळणार स्वस्त धान्य !

रेशनकार्ड नसलेल्यांना मिळणार स्वस्त धान्य !

🛑 रेशनकार्ड नसलेल्यांना मिळणार स्वस्त धान्य ! 🛑
चंद्रपूर:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

चंद्रपूर :⭕ ज्या कुटुंबाकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजनेअंतर्गत कोणतीही शिधापत्रिका नाही, ज्यांना अन्नधान्याची गरज आहे, असे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर अशा गरीब व गरजू शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना मे व जून 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह 5 किलो तांदूळ मोफत वितरित करण्याचे निर्देश आहेत. तसेच या लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब 1 किलो अख्खा चणा मोफत वितरित होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे.

प्रत्येक गावनिहाय व शहरी भागात वार्डनिहाय संबंधित तहसील, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडून गरजू व्यक्तींची यादी तयार करण्यात आली असून या यादीनुसार जिल्ह्यात 32 हजार 642 कुटुंबांमधील 1 लाख 16 हजार 124 लाभार्थी व्यक्ती निश्‍चित करण्यात आले आहेत.
सर्व लाभार्थ्यांना निश्‍चित केलेल्या स्वस्त धान्य दुकानातून जून महिन्यात मे व जून या दोन्ही महिन्यांचे धान्य एकत्रित, म्हणजेच 10 किलो प्रतिव्यक्ती तांदूळ व 2 किलो अख्खा चणा प्रतिकुटुंब या प्रमाणे एकदा वाटप करण्यात येणार आहे.

पात्र लाभार्थ्यांची यादी चंद्रपूर जिल्ह्यातील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून लाभार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे त्यांना धान्य वितरित करण्यात येणाऱ्या दुकानाची माहिती देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी त्यांना निश्‍चित करून दिलेल्या केंद्रावरून, स्वस्त धान्य दुकानातूनच धान्य प्राप्त करून घ्यावे लागेल. इतर केंद्रातून, स्वस्त धान्य दुकानातून त्यांना धान्य मिळणार नाही. निश्‍चित केलेल्या प्रत्येक केंद्र, स्वस्त धान्य दुकानामध्ये त्यांना जोडलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी धान्य घेण्यासाठी दुकानात एकाच वेळी गर्दी करू नये व मास्क घालून यावे. तसेच दुकानात सामाजिक अंतराचे पालन करावे. वरील धान्य वितरणासंबंधी काही तक्रारी असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-22-4950 व 1967 यावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.

anews Banner

Leave A Comment