🛑 मुंबईत बेशिस्तीचे दर्शन; सायन हायवेवर मोठी वाहतूक कोंडी 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕ मुंबईत सायन येथे आज सकाळी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सोमय्या मैदानाजवळ नव्याने घाऊक भाजी मार्केट सुरू करण्यात आले असून भाजीचे ट्रक तसेच अन्य वाहने मोठ्या प्रमाणात आल्याने या भागात बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात राज्यात अनेक सवलती देऊ केल्या असताना अशाप्रकारे वाहतूक कोंडी झाल्यास पुढची वाट बिकट ठरू शकते.
भायखळा, दादर या भागातील गर्दी कमी करण्यासाठी सायन हायवे येथे भाजी मार्केट हलवण्यात आले आहे. येथे सध्या मोठ्या प्रमाणात ट्रक, टेम्पोतून भाजीची आवक होते व तिथून मुंबईच्या विविध भागात भाजीचा पुरवठा होतो. हा भाजीपुरवठा सुरळीतपणे सुरू असताना आज सकाळी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने चिंता वाढली आहे.
आधीच भाजीचे ट्रक व टेम्पो मोठ्या संख्येने या भागात उभे असताना बस, कार, रिक्षा अशी वाहनेही रस्त्यावर उतरल्याने या भागात वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळाले. काहीही झाले तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे, असे सरकारचे स्पष्ट निर्देश असतानाही सायन भागात झालेल्या या वाहतूक कोंडीने डोकेदुखी वाढवली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अनेक सवलती देऊ केल्या आहेत. अशावेळी मुंबईत अशी वाहतूक कोंडी झाल्यास सवलतींपुढे नव्याने प्रश्नचिन्ह उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात आजपासून ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनचा हा पाचवा टप्पा असला तरी देश ‘ अनलॉक ‘ करण्याच्या दिशेने या टप्प्यात पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन प्रामुख्याने कंटेनमेंट झोनपुरताच असणार आहे. त्याबाबत केंद्राने गाइडलाइन्स जारी केल्यानंतर त्याला अनुसरून राज्यानेही गाइडलाइन्स तयार केल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विस्ताराने माहिती दिली आहे. ‘पुन:श्च हरिओम’ म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यात दिल्या जाणाऱ्या सवलतींचा उहापोह केला. ३ जूनपासून या सवलती देण्यात येणार आहेत. असे असतानाच मुंबईच्या रस्त्यावर झालेली वाहनांची गर्दी चिंता वाढवणारी ठरली आहे. ⭕
