आशाताई बच्छाव
शनि शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकले सील; पोलीस बंदोबस्तात कलेक्टरांकडून ‘देऊळ कार्यालय बंद’
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे- शनी शिंगणापूर देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय जिल्हा प्रशासनाने सील केले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. या घटनेमुळे मंदिर परिसरात आणि विश्वस्त मंडळात खळबळ उडाली आहे.
विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर येथे कागदपत्रांची हेराफेरी होत असल्याची माहिती समोर आली होती. यापूर्वीच मंडळावर भ्रष्टाचारासह अनेक आरोप झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच हे कार्यालय सील करून तातडीची कारवाई केली.
कार्यालय सील करण्यामागचा उद्देश म्हणजे विश्वस्त मंडळातील सदस्यांकडून मंदिराशी संबंधित भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होऊ नयेत हा होता. विशेष म्हणजे, ही कारवाई होत असताना येथील कार्यकारी अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले.
पोलीस बंदोबस्त, सामाजिक कार्यकर्ते आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत हे कार्यालय सील करण्यात आले असून, आता मंदिर समितीचा संपूर्ण कारभार शासनाच्या अखत्यारीत राहणार आहे.