आशाताई बच्छाव
अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई ६,३८,१०० रुपये दंड वसूल
जालना -वसंतराव देशमुख
१०/०९/२०२५
जिल्ह्यात अल्पवयीन वाहन चालकांकडून अपघात होणे त्यामध्ये अल्पवयीन चालक स्वतः जखमी होणे व इतरांना जखमी करणे अशा प्रकारची माहिती व तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली दिनांक १०/०९/२०२५ रोजी जालना शहर व जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालकाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली असून सदर मोहिमेसाठी समन्वयक म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे शहर वाहतूक शाखा यांना नेमले होते. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व प्रभारी ठाणेदार व सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन सकाळपासूनच शाळा, कॉलेज, शिकवणी वर्ग व महत्त्वाचे चौक या ठिकाणी कर्मचारी नेमून अल्पवयीन चालकांचा शोध घेतला असता जिल्ह्यामध्ये एकूण २०९ अल्पवयीन चालक वाहने चालविताना मिळून आले. सदरची वाहने व अल्पवयीन मुले यांना पोलीस स्टेशन व शाखा कार्यालय या ठिकाणी आणून त्यांच्या पालकांना बोलावण्यात आले. नमूद अल्पवयीन वाहन चालक यांना मोटार वाहन कायद्याबाबत मार्गदर्शन करून परत अल्पवयीन असताना वाहन न चालवण्याबाबत समज देण्यात आली. तसेच नमूद अल्पवयीन पालकांना सुद्धा योग्य ती समज देण्यात आली आहे. सदर कारवाई मध्ये एकूण ६,३८,१००/ रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे.
यापुढे कोणताही अल्पवयीन वाहन चालविताना मिळवून आल्यास त्यांच्या पालकाविरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद संबंधित पोलीस स्टेशनला करण्यात येईल व दोषारोपपत्र मा. उच्च न्यायालयात दाखल करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखा जालना यांच्याकडून करण्यात आले आहे.