Yuva maratha news
संपादकीय…
मालेगाव तालुक्यात “घरकुल योजनेचा” झांगडगुता!
वाचकहो,
प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत मालेगाव तालुक्यात बहुतांश नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे,ही जशी अभिमानाची व कौतुकाची गोष्ट असली तरीही… मालेगाव तालुक्यात मात्र सध्या घरकुल योजनेचा मोठाच झांगडगुता उभा राहिला आहे.काही ठिकाणी पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळूनही अद्याप मोफतची पाच ब्रास वाळू न मिळाल्यामुळे घरकुलाचे कामच पुर्ण होऊ शकलेले नाही.तर दुस-या बाजूला काही जागेवर फक्त जुन्याच घरांना डागडुजी करून सुधारणा करीत शासनाचा निधी लाटला गेला.अशी वस्तुस्थिती असताना प्रशासनातले सुस्तावलेले डोमकावळे मात्र या भयानक व गंभीररीत्या सुरु असलेल्या झांगडगुत्याकडे दुर्लक्ष करून मुद्दामच डोळेझाक करीत आहेत.
घरकुल योजनेचा झांगडगुता हा भविष्यात प्रशासनाला मोठा डोकेदुखी ठरेल यात तीळमात्र शंका नाही.
काही गावांमध्ये ज्यांच्याकडे स्वतः च्या व्यक्तीगत मालमत्ता आहेत अशा लोकांनी सुध्दा आता शासकीय जागेवरील गावठाणातील जागा बळकावून खुलेआम घरकुलाचे कामे सुरू केलेली आहेत, म्हणजेच शासनाला दोघांही बाजूने फसवून लुटायचे आणि हा सगळा कारभार प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांसमोर निर्लज्जपणे सुरू असताना प्रशासनातले बडे अधिकारी कुणाच्या दबाव दडपणाखाली कार्य करतात हे न समजण्या सारखे कोडे आहे. शासकीय जागेवर सामाजिक कार्य अथवा इतर प्रयोजनासाठी मागणी करणा-या एखाद्या व्यक्तीला वर्षानूवर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला महत्व न देता,फक्त काल परवा घरकुल योजनेच्या नावाखाली शासनाच्या जागा बळकावून व शासनाचा निधी लाटणा-यांना नेमकं समर्थन कुणाचे? खरं तर आता या घरकुल योजनेत सुरू असलेल्या झांगडगुत्त्याचा पर्दाफाश करण्यासाठी “युवा मराठा महासंघ”पुन्हा एकदा आंदोलनाची निर्णायक दिशा ठरवीत आहे.तरी तालुक्यातील खरे वंचीत अन्यायग्रस्त गोरगरीब, आदिवासीसह बहुजनांना आम्ही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत.व स्थानिक राजकीय संधीसाधू, विघ्नसंतोषी व समाजात सभ्यतेचा बुरखा पांघरून फिरणाऱ्या भामटयांचा या चळवळीतून खरा चेहरा जनतेसमोर आणूयात! एव्हढेच यानिमित्ताने!! (हाच अग्रलेख वाचा युवा मराठा वृत्तपत्रांच्या ताज्या व चालू अंकात)