Home नांदेड प्रा.आरोग्य केंद्र, राजगड ता किनवट येथे जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह साजरा…

प्रा.आरोग्य केंद्र, राजगड ता किनवट येथे जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह साजरा…

154
0

Yuva maratha news

1001809925.jpg

प्रा.आरोग्य केंद्र, राजगड ता किनवट येथे जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह साजरा…

हिरकणी माता व बाळकृष्ण बालक पुरस्काराचे वितरण (जिल्हा परिषदेच्या सिईओ मेघना कावली यांचा अनोखा उपक्रम)

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताहनिमित्त १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी कावली मेघना आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण जिल्हाभरात विविध विभागाच्या सहकार्य व समन्वयाने विविध उपक्रम घेऊन स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला.

या जनजागृती सप्ताहा अंतर्गत गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किशन गायकवाड यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात स्तनपानाचे महत्व अधोरेखित करणारे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र राजगड येथे सदर सप्ताह समारोपाच्या अनुषंगाने मार्गदर्शन व पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत पांडुरंग मामीडवार समन्वयक (आकांक्षित तालुका) व एन.एन.अनिलवार विस्तार अधिकारी (आरोग्य), डॉ.भाग्यश्री वाघमारे वैद्यकीय अधिकारी, डॉ चंद्रमुनीन झडते वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वागतगिताने झाली. स्वागतगीत आरोग्य सेविका पूजा गायकवाड यांनी गायले. त्यानंतर अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आणि आशा यांनी यशस्वी स्तनपानाच्या महत्वावर गित व नाटिका द्वारे प्रभावी सादरीकरण केले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरकणी व बाळकृष्ण पुरस्काराचे वितरण करण्यात आले, यात आदर्श गरोदर माता हिरकणी पुरस्कार जोत्स्ना अविनाश वाघमारे, आदर्श स्तनदा माता हिरकणी पुरस्कार गीता वैभव कदम तर सुदृढ बालक म्हणून बाळकृष्ण पुरस्कार प्रिन्स वैभव कदम यांना किट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व गरोदर मातांची ओटी भरून त्यांना पेंडखजूर याचे किट वितरण करण्यात आले. यानंतर मान्यवरानी स्तनपान करताना स्वछता, बाळाला धरायची योग्य पद्धत, दरवेळी स्तनपानाची वेळ किती असावी, आईच्या आहारात काय असावे याविषयी उपस्थित गरोदर व स्तनदा माता यांना विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका(आशा), आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया मेघना कावली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्तनपान जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून तालुक्यात स्तनपानाचे महत्व, फायदे, पहिले ०६ महिने निव्वळ स्तनपान, स्तनपानाच्या योग्य पद्धती-तंत्र व घ्यावयाची काळजी आणि कुटुंबाचे सहकार्य या संदर्भात तज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून गावपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे, अशा उपक्रमामुळे नक्कीच स्तनपानाबाबत समाजात सकारात्मक जागरूकता वाढीस लागेल.

ज्ञानेश्वर टाकरस,
गटविकास अधिकारी, किनवट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here