आशाताई बच्छाव
देवगड येथे लाखो भाविकांनी घेतले भगवान दत्तात्रयांचे दर्शन संत महंत वारकरी भाविक मोठ्या संख्येने सहभागी
नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी – दत्तजयंतीच्या निमित्ताने सकाळी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखीची मंदिर प्रांगणात प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत संत महंत वारकरी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी, टाळ मृदृंगाचा गजर करणारे भजनी सेवेकरी सर्व भाविकांचे आकर्षण ठरले होते.
दुपारच्या सत्रात ब्रम्हवृंद मंडळींच्या उपस्थितीत पाच दिवस येथील यज्ञ मंडपात चाललेल्या श्री दत्त यागाची गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांसह स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजेने पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आली. यावेळी दत्त यागाचे पौरोहित्य करणाऱ्या सर्व ब्रम्हवृंद मंडळींचा पाची पोषाख देऊन सत्कार करण्यात आला. दत्त यागामध्ये स्थापित केलेल्या भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची ब्रम्हवृंद मंडळींच्या उपस्थितीत वाजत गाजत प्रवरा नदी तीरावर नेण्यात आले. तेथे अवधूत स्नानाचा धार्मिक विधी वेदमंत्राच्या जयघोषात पार पडला. दत्तजयंती निमित्त पहाटे पासूनच गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन बारीत उभे राहून भगवान दत्तात्रयांचा नामघोष करत भगवान दत्तात्रयांसह किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांशी सुसंवाद साधत हसतमुखाने स्वागत केले.
श्री दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरीजी बाबाजींच्या मातोश्री सरुआई पाटील व स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते पाटील, महंत कैलासगिरीजी महाराज, महंत ऋषिनाथजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे आप्पासाहेब बारगजे, डॉ. जनार्धन मेटे महाराज, नेवासा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, रत्नमाला लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, संतोष माने, पंचगंगा सिड्सचे संचालक काकासाहेब शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काळे, किशोर जोजार, प्रदीप ढोकणे, विमा अधिकारी किशोर गारुळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, देवगड सुरक्षाधिकारी भाऊ नांगरे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.
भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर उपस्थित भाविकांना मंदिर परिसरात असलेल्या मैदानात पिठले भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले. दत्तजयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती. या यात्रेमध्ये विविध प्रकारची स्टॉल थाटण्यात आली होती. नेवासा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व होमगार्ड दलाचे समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता