⭕ संपूर्ण गाव झाले कोरोना मुक्त! यंत्रणेने सोडला सुटकेचा निःश्वास! ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
नाशिक – दाभाडी : गावाने अठरा दिवस तणावाखाली काढले. तालुका आरोग्य व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या कार्यवाहिला घवघवीत यश मिळाले असून गावातील चौदाही कोरोना रुग्ण बरे होऊन ता.२० घरी सोडण्यात आलेत. गाव कोरोना मुक्त झाल्याने ग्रामस्थांसह संपूर्ण यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडताच गावात आनंदाची लहर उमटली आहे. एकही रुग्ण न दगावता गाव कोरोनामुक्त झाले. या यशामुळे कार्यरत यंत्रणेचे कौतुक होत आहे.
जेव्हा गावात पहिला रुग्ण आढळला तेव्हा…
ता.२ मे रोजी दाभाडी गावात पहिला रुग्ण आढळून आला आणि तालुक्यातील ग्रामीण भागात घबराट पसरली. रुग्णांची संख्या वाढत जात ती चौदा पर्यंत पोहचली गेली.
मात्र जिल्हा व तालुकास्तरावरून आरोग्य व महसूल विभागाने जलद उपाययोजना राबवल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा कार्यरत झाली. गावाबाहेर सोयीयुक्त कै.इंदूबाई हिरे वसहतीगृहात ताप उपचार केंद्र, संशयित विभाग, विलगीकरण विभाग स्थापन करण्यात आले व अद्ययावत सुविधा स्थापित करण्यात आल्याने रुग्णांना वेळीच उपचार मिळाले. रुग्णांना दिवसातून तीन तर रात्रीतून दोन वेळा नियमित तपासण्या करण्यात येऊन वैद्यकीय सेवा देण्यात आली.राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, जि.प.सदस्या संगीता निकम, पं स.सदस्य अरुण पाटील, सरपंच चारुशीला निकम यांचेसह ग्रा.पं. सदस्यांनी गाव कोरोनामुक्त झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.
प्रशासनाची अंतर्गत व बाह्य स्वच्छता मोहीम
प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली येथील रुग्णांना औषधी व सकस आहार पुरवण्यात आला, तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्या निर्देशानुसार तलाठी पी. पी. मोरे आणि महसूल विभागाने रुग्णांना नियमितपणे नाश्त्यासह दोन वेळच्या जेवणाची चोख व्यवस्था केली, येथील ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने अंतर्गत व बाह्य स्वच्छता मोहीम राबवली. या प्रवासात पोलीस यंत्रणेसह स्थानिक सेवाभावी संस्था, गावातील माजी पदाधिकारी मदतीसाठी धावून आले.आगामी काळात आरोग्य व महसूल विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यश मिळाल्याने आनंद
गत अठरा दिवस तणाव पूर्ण होते, आमच्या शैक्षणिक संस्थेचे संपूर्ण सोयीयुक्त युनिट आरोग्य यंत्रणेच्या हवाली करतांना गाव संकट मुक्त व्हायला हवे हा ध्यास होता त्यात यश मिळाल्याने आनंद होतोय.- मनोज पाटील,संस्थापक अध्यक्ष, हिरे शैक्षणिक संकुल दाभाडी