आशाताई बच्छाव
विष प्रकरणातील दोषी व्यक्तींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे यांना निलंबित करा
आमदार डॉ देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी
रोपिनगट्टा येथील ४ जुलैच्या नामकरण सोहळ्यातील जेवणातून झालेल्या विषबाधित प्रकरणाचा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून उचलला मुद्दा
जीवे मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाही करण्याची केली मागणी
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
रोपिनगट्टा येथील ४ जुलैच्या नामकरण सोहळ्यातील जेवणातून झालेल्या विषबाधित प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन पेंढरी येथे गेलेल्या विषबाधित व्यक्ती व नातेवाईकांची तक्रार दाखल करून न घेता उलट त्यांनाच मारहाण करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे पेंढरीचे पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे यांना तात्काळ पदावरून निलंबित करावे अशी मागणी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातुन विधानसभेत केली.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील झाडापापडा ग्रामपंचायत अंतर्गत रोपिनगट्टा येथे ४ जुलै रोजी विनिया टेकाम यांचेकडील नामकरण सोहळ्यात बनविलेल्या जेवणात जाती दुश्मनी काढण्याच्या दृष्टीने अज्ञात व्यक्तीने विष टाकून संपुर्ण परिवाराला ठार करण्याचा प्रयत्न केला. त्यात ७० लोकांना विषबाधा झाल्याने त्यांना पेंढरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील प्रकृती चिंताजनक झालेल्या २७ रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे तर ८ रुग्णांना छतीसगड राज्यात भरती कऱण्यात आले. या प्रकरणातील विष टाकणारा संशयित व्यक्ती धनीराम दुग्गा या व्यक्तीची तक्रार करण्यासाठी दिनांक ८ जुलै २०२४ ला पोलीस स्टेशन पेंढरी येथे विषबाधित व्यक्ती व नातेवाईक गेले असता त्यांची तक्रार दाखल करून न घेता गोपीचंद लोखंडे पोलिस उपनिरीक्षक पेंढरी यांनी तक्रारकर्त्या ८ लोकांना बेदम मारहाण केली व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पेंढरी पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे हे दोषी व्यक्तींना पाठीशी घालत असून निर्दोष लोकांवर अत्याचार करीत आहेत. गावात जाऊन दमदाटी करून ग्रामस्थांना धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सदर प्रकरण अतिशय गंभीर असून दोषी व्यक्तींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे यांना तात्काळ पदावरून निलंबित करावे व ज्यांनी अन्नातून विष टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यांची चौकशी करून त्यांचेवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी आमदार डॉ देवराव जी होळी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातुन विधानसभेत केली.