Home रायगड दूर्गसृष्टीच्या जिर्णोध्दारासाठी स्थानिक नागरिकांनीच एकवटण्याची गरज निर्माण झाली आहे.

दूर्गसृष्टीच्या जिर्णोध्दारासाठी स्थानिक नागरिकांनीच एकवटण्याची गरज निर्माण झाली आहे.

37
0

आशाताई बच्छाव

1000532199.jpg

दूर्गसृष्टीच्या जिर्णोध्दारासाठी स्थानिक नागरिकांनीच एकवटण्याची गरज निर्माण झाली आहे.

युवा मराठा न्यूज पोलादपूर / रायगड प्रतिनिधी :- रफिक मुल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची वेळ अचूक सांगणाऱ्या कवींद्र परमानंद यांच्या पोलादपूर तालुक्यातील एस.टी. स्थानकापासून काही पावलांवरील मठाच्या परिसरातील दूर्गसृष्टी आता जिर्णावस्थेत गेली असून या दूर्गसृष्टीच्या जिर्णोध्दारासाठी स्थानिक नागरिकांनीच एकवटण्याची गरज निर्माण झाली आहे. या कामी सक्रीय झालेले असंख्य कार्यकर्ते पुढे राजकीय पक्षाचे झेंडे घेऊन मोठे झाले असून त्यांनी या उपक्रमाकडे सपशेल दूर्लक्ष केले असल्याने दूर्गसृष्टीची दूरवस्था ओढवली आहे.

पोलादपूर शहरातील शिवकालीन स्वामी कवींद्र परमानंद यांच्या समाधीस्थळी दरवर्षी मकरसंक्रांतीचा वार्षिकोत्सव आणि गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारण्याचा उपक्रम अखंडीतपणे सुरू आहे. मात्र, येथे गेल्या काही वर्षांपूर्वी सौंदर्गीकरणाचे काम रखडले. यानंतर साकारण्यात आलेल्या दूर्गसृष्टीकडे संबंधित संस्थेकडून अक्षम्य दूर्लक्ष झाल्याने दूरवस्था झाली. विधानपरिषद सदस्य अशोक मोडक यांच्या निधीतून तत्कालीन भाजपा तालुकाध्यक्ष मनोज भागवत यांच्या पाठपुराव्यातून 19 एप्रिल 1997 रोजी स्वामी कवींद्र परमानंद यांच्या समाधीस्थळी झालेल्या सुशोभिकरणाचा उद्घाटनसोहळा तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, बांधकाममंत्री नितीन गडकरी, राज पुरोहित आणि आ. अशोक मोडक यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी याठिकाणी समाधीस्थळ आणि वाचनालयाची खोली यांचा समावेश होता. यावेळी परमानंदांच्या जीवनाचा अल्पपरिचय देणारा लेख भिंतीवर रंगविण्यात आला होता. यानंतर पोलादपूर ग्रामपंचायतीकडून रायगड जिल्हा परिषदेमार्फत तत्कालीन उपाध्यक्ष माणिक जगताप यांनी स्वामी परमानंद मित्र मंडळ या नोंदणीकृत संस्थेला दिवाबत्तीसाठी काही रक्कमेची तरतूद केली होती. याशिवाय, पोलादपूर ग्रामपंचायतीने काही रक्कम खर्ची घालून संरक्षण भिंत तसेच रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी पानिपतकार विश्वास पाटील यांनी सौंदर्गीकरणासाठी निधीची उपलब्धता केली. हे काम अपूर्ण असतानाच एका स्थानिक संस्थेमार्फत येथे दूर्गसृष्टी उभारण्याचे काम सुरू झाले. यानंतरही काही लोकप्रतिनिधींनी येथे निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने सदर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतील उत्साह कमी झाला.

साधारणतः तोरणा, सिंधुदूर्ग, राजगड, शिवनेरी, चाकण, लोहगड, पुरंदर, प्रतापगड, जंजिरा आदींसह 17 भूईकोट, जलदूर्ग आणि गडकिल्ले यांच्या प्रतिकृती उभारल्यानंतर याकामी पदाधिकाऱ्यांचे दूर्लक्ष होऊ लागले. परमानंदांच्या जीवनाचा अल्पपरिचय देणारा लेखही या संस्थेकडून भिंतींना रंगसफेदीदरम्यान पुसण्यात आला असल्याबद्दल सातत्याने विचारणा होऊनही आम्ही पक्क्या स्वरूपात लेख लिहिणार असल्याची माहिती संबंधितांकडून दरवर्षी देण्यातयेऊ लागली.

यादरम्यान, पोलादपूर शहराच्या मध्यवर्तीठिकाणी असलेल्या या कवींद्र परमानंद मठ परिसरात हिंदू मुस्लीम ऐक्याची प्रचिती संक्रांत आणि गुढीपाडवा मेळाव्यासह अनेक सार्वजनिक उत्सवप्रसंगी दिसून आली आहे. पोलादपूर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर याठिकाणचे स्थानिक नगरसेवक संगिता इंगवले आणि सध्याचे स्थानिक नगरसेवक प्रसाद इंगवले या मुलगा व माजी नगरसेविका असलेल्या त्यांच्या आईंनी संघटनात्मक कार्यासह या स्वामी कवींद्र परमानंद मठामधील उत्सव सुरू ठेवले.
गेल्या दीड वर्षापूर्वीच या समाधीस्थळाचे सुशोभिकरण करण्यासाठी नगरपंचायतीने खर्च केला असून महाबळेश्वर रस्त्यालगतच्या बाजारपेठ रस्त्याच्या प्रारंभी दहा पावलांवर या मठाच्या प्रवेशद्वाराची कमान उभारण्यात आली आहे. ऐतिहासिक वास्तुला सध्या अत्याधुनिक कार्यालयासारखे स्वरूप आणून झालेले सुशोभिकरण जरी दृष्टीकोनातून खटकत असले तरी सुशोभिकरण झाले असल्याचे समाधान वाटत आहे. पोलादपूर शहरातील स्मारकाचे सुशोभिकरण करताना तेथील दुर्गसृष्टीचे अस्तित्व आणि दुर्गसृष्टी उभारताना त्यासाठी जमा केलेल्या देणग्यांचा हिशोब मागणारे आणि न देणारे सध्या एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि आतून एकजूट असल्याचे जाणवत असले. तरी जनतेच्या पैशाचा हिशोब आता पुन्हा मिळणे नाही. यामुळे आता कवींद्र परमानंद मठगल्ली परिसरातील नागरिकांनीच पुढाकार घेऊन दूर्गसृष्टीची दूरवस्था दूर करण्यासोबत राजकीय झालेल्यांना दूर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here