राजेंद्र पाटील राऊत
एसटी संपाचा फटका मालवाहतूक कंपनीला बसला आहे,मालवाहतुकीचा व्यवसाय ठप्प झाल्याने मोठे आर्थिक नुकसान
ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
ऐन हंगामाच्या काळात एसटी सेवा बंद असल्यामुळे मालवाहतुकीचा व्यवसाय ठप्प झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असून राज्यभरातील तीन हजार कर्मचाऱ्यांचेदेखील मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या नाशवंत मालाचे नुकसान होत आहे.
मागील दोन आठवडय़ांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे.
त्याचा फटका प्रवाशांबरोबरच राज्य परिवहन महामंडळाला बसत असतानाच एसटीतून मालवाहतूक करणाऱ्या खासगी कंपनीही यामुळे मोठय़ा आर्थिक तोटय़ाचा सामना करावा लागला आहे. या व्यवसायाला करोनाकाळातही मोठय़ा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले होते. करोनाकाळात एसटी सेवा बंद असल्यामुळे ६० टक्के व्यवसाय बुडाला होता.
मागील दोन आठवडय़ांपासून एसटीतून मालवाहतूक करणाऱ्या राज्यातील खासगी कंपनीचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असून पाच हजार ग्राहकांनी माल परत घेतला आहे.
कंपनीत काम करणाऱ्यांना कामाप्रमाणे पैसे दिले जात असल्याने त्यांचा रोजगार बुडाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीतून आर्थिक फायदा मिळावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने खासगी कंपन्यांना एसटीतून मालवाहतूक करण्यास परवानगी दिली.
२००५ पासून ही सुविधा सुरू करण्यात आली. या कामाचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीच्या माध्यमातून राज्यभरात विविध मालांची एसटीतून वाहतूक केली जाते.
यातून कंपन्यांना आर्थिक फायदा मिळण्याबरोबरच महामंडळालाही उत्पन्न मिळते. एसटी महामंडळ दर तीन वर्षांनी निविदा प्रक्रिया राबवून या कामाचा ठेका देण्यात येतो. नेमण्यात आलेल्या मालवाहतूक कंपनीचे राज्यभरात प्रत्येक आगारानुसार सुमारे २८५ कार्यालये आहेत. या कार्यालयात जवळपास तीन हजार कर्मचारी काम करत आहेत.
या कंपनीच्या माध्यमातून एसटीतून दूध, दुग्धजन्य पदार्थ, कपडे, पुस्तके, अन्नधान्य, बी-बियाणे अशा अनेक प्रकारच्या वस्तूंची राज्यभरात मालवाहतूक केली जाते. वस्तूचे वजन आणि किलोमीटर याप्रमाणे त्यांचे दर आकारले जात असून अवघ्या २४ तासांत वस्तू पोहोचविण्याचे काम कंपनीमार्फत करण्यात येते. ही अत्यंत जलद सेवा असल्यामुळे त्यास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. दर दिवसाला राज्यभरातून ११ ते १२ हजार मालाची वाहतूक होते. एकूण उत्पन्नातील ६० टक्के हिस्सा कंपनीला तर, उर्वरित ४० टक्के हिस्सा महामंडळाला मिळतो. या कंपनीला दिवसाला दहा लाखांपर्यंतचे उत्पन्न कंपनीला मिळते, तर महामंडळाला ४ लाखांचे उत्पन्न मिळते.