आशाताई बच्छाव
श्रीरामपुरात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
४० वर्षांचे श्रीरापुरकरांचे स्वप्न पुर्ण : फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी
श्रीरामपूर, (प्रतिनिधी दिपक कदम)
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजी मंडई समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण काल उत्साहात झाले. गेल्या ४० वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वप्न श्रीरामपूरकरानी पाहिले होते ते आज पुर्ण झाले. सुमारे २० मिनिटे सुरू असलेल्या फटाक्यांच्या अतिषबाजीने डोळ्यांचे पारणे फेडणारा अनावरणाचा नयनरम्य सोहळा आज श्रीरामपुरकरांनी अनुभवला.
यावेळी आ. अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, लहू कानडे, महंत अरुणनाथगिरी महाराज, प्रांताधिकारी किरण सावंत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप
भालसिंग, उपजिल्हाध्यक्ष दिपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, आशिष धनवटे, राकेश न्याती, केतन खोरे, सागर बेग, राजेंद्र देवकर, अशोक कानडे, प्रदीप वाघ, बाबा शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील सर्व प्रभागातून डोलीबाजा लावून भगव्या टोप्या, ध्वज हाती घेऊल शिवप्रेमी दुपारी तीन वाजेपासून हजेरी लावत होते. अनेक भागातून दुचाकी रॅली काढण्यात आल्या. व्यासपीठासमोर तरूण-तरूणींनी शिवकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली. सायंकाळी मंत्री उदय सामंत व राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यावेळी छत्रपतींच्या स्मारकासाठी आजपर्यंत योगदान देणाऱ्या आजी-माजी आमदार, खासदारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी
महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सामंत यांच्या हस्ते कळ दाबून अनावरण व लोकार्पण झाले. डॉ. सुजय विखे यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे करण्यात आलेली फटाक्यांची आतिषबाजी उपस्थितांचे डोळ्यांचे पारणे पेडणारे ठरली. महाराजांच्या पुतळ्यावरील आच्छादन बाजूला होताच श्रीरामपूरकरांनी जय भवानी, जय शिवाजी असा एकच जल्लोष केला. यानंतर सामंत, राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी चित्रकार रवी भागवत यांनी साकारलेल्या ३५० फूट आकारातील तैलचित्राचेही अनावरण करण्यात आले. या सोहळ्यातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेचे प्रमाणपत्र मंत्री सामंत, विखे यांच्या हस्ते रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सुभाष त्रिभुवन, भीमा बागूल यांच्यासह पुतळा समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आले. डॉ.
आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या वॉक थ्रूचे सादरीकरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सुजय विखे यांनी स्वतः माईक हातात घेत पार पाडले. यावेळी त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याने श्रीरामपूरकरांचा एक संघर्ष संपला असला तरी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पूर्ती केली जाईल. महात्मा गांधी चौकांपर्यंतच्या रस्त्यासाठी माजी खासदार लोखंडे यांनी पाच कोटी, तर पालकमंत्री विखे यांनी जिल्हा नियोजनातून दोन कोटी रूपये या रस्त्यासाठी मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, गेल्या अनेक दशकांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा हे श्रीरामपूरकरांचे स्वप्न साकार करण्याचे भाग्य आपल्याला मिळाल्याचा आनंद होत आहे.






