आशाताई बच्छाव
शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे – श्री शनैश्देवरवस्थान, शनिशिंगणापूर येथील विश्वस्त मंडळाला भ्रष्टाचाराचे आरोप, गैरव्यवस्थापन, बनावट अॅप घोटाळा, कर्मचारी वर्गातील वाद आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न या पार्श्वभूमीवर अखेर शासनाने बरखास्त केले आहे. महाराष्ट्र शासनाने २२ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांची तात्पुरते प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून समिती गठीत होईपर्यंत तेच देवस्थानचा कारभार पाहणार आहेत. हा आदेश राज्यपालांच्या नावाने जारी करण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार, १३ ऑगस्ट २०१८ रोजी श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम, २०१८ राजपत्रात प्रसिद्ध झाला होता. भाविकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी, पारदर्शक व उत्तरदायित्वपूर्ण प्रशासन घडवण्यासाठी आणि देवस्थानवरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा अधिनियम लागू करण्यात आला होता. सदर अधिनियमाचा प्रत्यक्ष अंमल मात्र २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झाला आहे.