Home सामाजिक संतांच्या देहाची संगती लाभणे कठीण आणि दुर्मिळ

संतांच्या देहाची संगती लाभणे कठीण आणि दुर्मिळ

97
0

आशाताई बच्छाव

1001940162.jpg

संतांच्या देहाची संगती लाभणे कठीण आणि दुर्मिळ

सत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे. संतांची संगत दोन प्रकारे होऊ शकते. एक, संतांच्या देहाची; दुसरी, संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची. ह्यांपैकी पहिली, म्हणजे संताच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ. कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते, आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणूकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो; आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच. म्हणून पहिला, म्हणजे संताच्या देहाच्या संगतीचा मार्ग, हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसर्या मार्गाने जाण्यात, म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात, बिलकूल धोका नसतो; कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय, कोणीही झाला तरी तो दुसर्याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी, आपला भोंदूपणा लपविण्याकरिता, जे बरोबर असेल तेच सांगणे त्याला जरूर असते. साधकाने शुध्द भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते. खर्या संताच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात् प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होते. त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो; फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते. तसे आपण खर्या संताजवळ नुसते पडून राहावे. संताच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्व असते. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्तीदेखील नको असे म्हटले, फक्त संतसंगती दे असे म्हटले.संतसंगाने नाम घेण्याची बुद्धी येते. बुद्धीची स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल. नाम जरूर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते. आपण अनन्यभावाने नाम घ्यावे. नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते; आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वरप्राप्ती होते. संतसंगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते. सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडते. म्हणून प्रयत्नाने संतसंगती करावी. तिथे प्रारब्ध आणू नये. सत्संगतीत राहून नाम घेतले तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येते.

भागवताचार्य हभप सुवर्णा माई जमधडे
ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था वडगाव (बल्हे) येवला

Previous articleलोकहित माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर
Next articleवनसगाव विद्यालयाच्या मुलींच्या दोन खो खो संघांची जिल्हा पातळीवर निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here