आशाताई बच्छाव
मराठा आरक्षणासाठी दस्तऐवजांची मागणी; सकल मराठा समाज मुखेडच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदन
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
ओबीसी प्रवर्गातील आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता व्हावी, यासाठी सकल मराठा समाज, मुखेड यांच्या वतीने बुधवारी (दि. १० सप्टेंबर) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नुकत्याच राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हैद्राबाद गॅजेट स्वीकारण्यात आले आहे. मुखेड तालुक्यातील बराचसा भाग हा निजामकाळात सध्याच्या तेलंगणा राज्यात असल्याने तेथील आदिलाबाद, मुधोळ आणि इतर ठिकाणी मराठा बांधवांच्या कुणबी जातीच्या नोंदी उपलब्ध आहेत.
या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयामार्फत १८८१ चा गाव नमुना खासरा, १९६४ कर पत्रक आणि १९६७ पूर्वीची नोंदी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या दस्तऐवजांच्या आधारे मराठा समाज बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे निवेदन सकल मराठा समाज, मुखेड यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले असून, त्याच्या प्रती विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी, नांदेड आणि उपजिल्हाधिकारी, देगलूर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.