आशाताई बच्छाव
पूरबाधित शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर तात्काळ मदत जाहीर करा; अन्यथा.
– कैलास येसगे कावळगावकर
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर–
ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे देगलूर, बिलोली, मुखेड तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शेतीची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. खरीप पिकांसह शेतातील माती, जनावरे व घरंही अक्षरशः वाहून गेली. हाता तोंडाशी आलेले मूग, उडीद पिकांसह सोयाबीन व तुरीचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी दि. 29 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे कोल्हापूरच्या पूरबाधित शेतकऱ्यांना केलेल्या विशेष मदतीच्या धर्तीवर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते तथा काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना निवेदनामार्फत केली.
शेतकऱ्यांसोबतच शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांचेही या पूर परिस्थितीमुळे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतमजुरांनाही आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्यामुळे पीक कर्ज भरणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी. पिकविमा कंपनी सोबत झालेल्या करारातील नवीन बदलांमुळे शेतकऱ्यांना पिक विम्या पासून वंचित रहावे लागेल. त्यामुळे पीक कापणी प्रयोगाची अट रद्द करून अतिवृष्टीग्रस्त व पूरबाधित शेतकऱ्यांना तात्काळ पिकविमा लागू करून वितरित करण्याचा शासनाने आदेश काढावा, मृत जनावरे व घरपडीची नुकसान भरपाई तात्काळ मंजूर करून वितरित करावे अशा मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले.
सद्यस्थितीत शासन नियमाप्रमाणे मिळणारी शासकीय मदत अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे झालेली नुकसानी पाहता कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना तात्काळ विशेष मदत करावी; अन्यथा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संघटित करून तीव्र आंदोलन उभा करून शासनाला हा निर्णय घेण्यास भाग पाडू.
– कैलास येसगे कावळगावकर