Home नाशिक देवळा तालुक्यातील बेपत्ता पल्लवीचा अखेर मृतदेह सापडला, सर्वत्र हळहळ

देवळा तालुक्यातील बेपत्ता पल्लवीचा अखेर मृतदेह सापडला, सर्वत्र हळहळ

829

आशाताई बच्छाव

1001808760.jpg

देवळा, भिला आहेर तालुका प्रतिनिधी: खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इयत्ता नववीत शिकणारी पल्लवी समाधान पगार (वय 14) हिचा मृतदेह शनिवारी (दि. 9) दुपारी 1 वाजता घराशेजारील विहिरीत तरंगताना आढळून आला. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खडकतळे (ता. देवळा) येथील पल्लवी गुरुवारी (दि. 7 ऑगस्ट) कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला, तसेच देवळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

सलग दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी (दि.१) दुपारी घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयतांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी नातेवाईकांची समजूत काढली असून पोलीस तपासात आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला असून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास देवळा पोलीस करीत आहेत.