आशाताई बच्छाव
खुतमापूर रस्त्याच्या दुरवस्थेला ग्रामस्थांचा विरोध; ११ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
खुतमापूर, ता. देगलूर :
खुतमापूर ते खुतमापूर फाटा या सुमारे दीड किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. १० ऑगस्टपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास ११ ऑगस्टपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देगलूर येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः रमतापूर, कोकलगाव आणि खुतमापूर या गावांतील विद्यार्थी दररोज हणेगाव शाळेत ये-जा करतात. रस्त्याच्या खस्ताहाल अवस्थेमुळे त्यांची मोठी दमछाक होत असल्याने पालकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.
ग्रामपंचायत सरपंच बालाजी मारोतीराव चोपडे यांच्या सदस्य सरावन ठवरे सदस्य विष्णू शिंगटे भावी सरपंच प्रशांत वलकले सचिन गायकवाड नेतृत्वाखाली मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, देगलूर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात, १० ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, गावकरी एकत्र येत मोठ्या संख्येने आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, रस्त्याची बिकट अवस्था लक्षात घेता लवकरात लवकर उपाययोजना व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.