Home नाशिक बांगलादेश सरकारकडुन भारतीय कांद्याच्या आयातीवरील बंदी तात्काळ उठविण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप...

बांगलादेश सरकारकडुन भारतीय कांद्याच्या आयातीवरील बंदी तात्काळ उठविण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

130

आशाताई बच्छाव

1001661784.jpg

बांगलादेश सरकारकडुन भारतीय कांद्याच्या आयातीवरील बंदी तात्काळ उठविण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

सभापती डी. के जगताप यांची मागणी

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

मागील तीन महिन्यांपासुन बांगलादेश सरकारकडुन भारतीय कांद्याच्या आयातीवर लादलेली बंदी तात्काळ उठविण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर किसन (डी. के.) जगताप यांनी केंद्र शासनाकडे केली.
यासंदर्भात लासलगांव बाजार समितीने केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान, अर्थ व कार्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मागील तीन महिन्यांपासुन बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीवर कोणतीही अधिकृत घोषणा न करता अघोषित बंदी घातली आहे. यामुळे भारतातील कांदा निर्यात पूर्णतः ठप्प झाली असुन, त्याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी वर्गास बसत आहे.
महाराष्ट्रातील लासलगांव, नाशिक, सोलापूर, पुणे, आहिल्यानगर तसेच इतर कांदा उत्पादक भागात याचा गंभीर परिणाम दिसुन येत आहे. यावर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाले असतानांही निर्यातीचा मार्ग बंद झाल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा साठा वाढला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दररोज साधारणत: १,५०,००० क्विंटल कांद्याची विक्री होत असुन दर फक्त १,२००/- ते १,५००/- रूपये प्रति क्विंटल मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाची भरपाई होणंही अशक्य होत आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतातुन सुमारे ४.८० लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात फक्त बांगलादेशात झाली होती. यामधून १,७२४ कोटी रूपयांचे परकीय चलन देशाला मिळाले होते. या आकडेवारीवरून बांगलादेश हा कांदा निर्यातीसाठी अत्यंत महत्वाचा आणि प्रमुख भागीदार देश आहे हे स्पष्ट होते.वर नमुद वस्तुस्थिती विचारात घेता शेतकरी हिताच्या दृष्टीने केंद्र शासनाने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून उद्भवलेल्या परिस्थितीवर उपाययोजना करणेच्या दृष्टीने बांगलादेश सरकारसोबत उच्चस्तरीय चर्चा करून कांद्याची आयात पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून कांदा निर्यात सुरळीत होऊन देशांतर्गत बाजारातील मागणी-पुरवठ्यात समतोल राखला जाईल व शेतकरी बांधवांना देखील वाजवी दर मिळू शकतील अशी मागणी श्री. जगताप यांनी केली.