आशाताई बच्छाव
अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
अहिल्यानगर महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीची गुरुवारी (ता. २६) दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारपासून सलग तीन दिवस अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भाग व उपनगरातील पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
महावितरण प्रशासनाकडून विद्युत यंत्र सामुग्रीची देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत महापालिकेकडून शहर पाणी योजनेवरील दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर शहारातील मध्यवर्ती भाग व उपनगरातील ज्या भागात गुरुवारी (ता. २६) पाणी पुरवठा होणार आहे तेथे शुक्रवारी (ता. २७), शुक्रवारी (ता. २७) पाणी पुरवठा होणाऱ्या भागाला शनिवारी (ता. २८) तर शनिवारी (ता. २८) पाणी पुरवठा होणाऱ्या भागाला रविवारी (ता. २९) पाणी पुरवठा होईल, असे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.