आशाताई बच्छाव
आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा : डॉ. शेटे अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून सामान्यांना आरोग्याच्या सेवा मोफत व अधिक दर्जेदार मिळाव्यात यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पाच लक्ष रुपयांपर्यंतचे उपचार मोफत स्वरुपात देण्यात येत असल्याने गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देत आरोग्याच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. शेटे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी नंदकुमार नेहरकर, आयुष्यमान भारत योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. वसीम शेख आदींची प्रमुख उपस्थिती.
जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत इतर संबंधित शासकीय यंत्रणांनी गोल्डन कार्ड नोंदणी व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी. या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांच्या होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत. जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेंतर्गत १७७ कोटी रुपये खर्च करत ७५ हजार रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.






