Home सामाजिक तुमच्या मुलींना हुंडाबळी होण्यापासून वाचवण्यासाठी…

तुमच्या मुलींना हुंडाबळी होण्यापासून वाचवण्यासाठी…

29
0

आशाताई बच्छाव

1001528030.jpg

तुमच्या मुलींना हुंडाबळी होण्यापासून वाचवण्यासाठी…

सध्या वैष्णवी हगवणे या भगिनीची हुंडाबळी केस सर्वत्र गाजते आहे. पैशासाठी किती निर्दयीपणे मुलींना मारून टाकण्यात येते आणि इतक्या नीच मानसिकतेचे लोक समाजात उजळ माथ्याने वावरतात हे बघून मान खाली जाते. ज्या देशात राजा राम मोहन रॉय, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज, गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर कर्वे असे थोर समाजसेवक होऊन गेले त्या देशात अशा घटना घडणे यासारखी लांच्छनास्पद गोष्ट नाही. किती हुंडा घेतला यावरून लोकांची प्रतिष्ठा ठरते आणि हुंड्याची रक्कम लोक अभिमानाने सांगतात. काही ठिकाणी हुंडा नको नको म्हणत गाडया, महागड्या वस्तू अथवा भरमसाट सोने घेण्याचीही आडवळणाने प्रथा आहे. आता ज्यांच्याकडे कमावलेला अथवा भ्रष्टाचाराचा पैसा आहे ते देतात कौतुकाने. पण ज्या लोकांची तेवढी आर्थिक परिस्थिती नाही त्या बिचाऱ्यांना या दुष्टचक्रात फासण्यावाचून गत्यंतर नाही. खरे म्हणजे आपल्याकडे सामाजिक सुधारणांची सुरुवात होऊन दिड दोनशे वर्षे होऊन गेलेत. पण तरीही २१व्या शतकातल्या आधुनिक काळातही हुंड्यासारख्या नीच प्रथा सुरु आहेत हीच अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.

सध्या इव्हेंट लग्नाच्या नावाचाही हिडीस प्रकार सुरु आहे आणि त्यात कोटयावधी रुपये खर्च होतात. हा इव्हेंट लग्नांचा सर्वात मोठा बाजार जर कुणी मांडला असेल तर तो इझी मनी कमावणारे राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांनी. उद्योगपती आणि अन्य क्षेत्रातील स्वतःला प्रतिष्ठित समजणारी मंडळीही यात सामील आहेच. तुम्ही एखाद्या आमदार, खासदार, मंत्री, जीप सदस्य अशा राजकीय नेत्याच्या किंवा सरकारी अधिकाऱ्याच्या घरच्या लग्नाला गेले तर कळते एकेका लग्नात ३-४ कोटी रुपये सहज खर्च होतात. (सन्माननीय अपवाद आहेतच). साखरपुडा, प्रिवेडिंग फोटो शूट, हळद, संगीत, वैदिक लग्न, अक्षदा लग्न, रिसेप्शन या प्रकारांवर लाखो रुपये खर्च केले जातात. हा वारेमाप उधळला जाणारा पैसा कुठल्या भ्रष्ट मार्गाने येतो हे ओपन सिक्रेट आहे पण तोंडावर कुणी बोलत नाही इतकेच.

खरे म्हणजे राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी हे लोक समाजाच्या अग्रभागी असल्याने त्यांची कृती ही इतरांसाठी अनुकरणीय असते. पण चांगल्या कृतीतून समाजाला दिशा देणारे लोक अपवादानेच आढळतात. आपल्याकडे असलेल्या भ्रष्ट पैशांची उधळपट्टी करणारेच जास्त असतात. त्यामुळे ऐपत असो नसो खोट्या प्रतिष्ठेसाठी मग बहुतांश लोक त्यांचे अनुकरण करतात. अनेक मुलाकडची मंडळी तर अजूनही हा सर्व खर्च मुलीच्या बापाने करावा अशा मानसिकतेत असतात. अर्थातच अनेक मुलींचे पालक हे मान्य करतात हेही चुकीचे आहे. आपल्या शिकल्या सवरल्या मुली अशा हावरटांच्या घरात पाठवताना त्यांनीही शंभर वेळा विचार करायला हवा. त्यातूनच फुकटची सवय झाल्याने काही मुलाकडचे लोक लग्नानंतरही अवास्तव मागण्या करत राहतात. मुलीचे भले व्हावे यास्तव अनेक लोक कर्ज, उधार उसनवारी करून असल्या नालायक हावरट लोकांच्या मागण्या पूर्ण करत राहतात. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत कि मग त्यातून वैष्णवीसारख्या मुलींचा बळी जातो.

हे सगळे अधून मधून होत राहते, पण त्यातून कुणी बोध घेत नाहीत, हे चित्र बदलावे असेही कुणाला वाटत नाही. एखादी घटना घडली कि लोक तात्पुरती हळहळ व्यक्त करतात आणि विसरतात, आपल्या घरचे लग्न निघाले कि पुन्हा तोच कित्ता गिरवतात.

या सगळ्या प्रकारात अजून एका घटकाचा मोठा दोष आहे. तो म्हणजे तरुण पिढीचा. आजकाल अनेक मुलं-मुली उच्च शिक्षित असतात. पण तेही या खोट्या बडेजावातून बाहेर येऊ इच्छित नाही. त्यांनाही लग्न सोहळ्यात मांडला जाणारा स्वतःचा बाजार थांबवण्याची इच्छा नसते. बिनदिक्कत हुंडा घेतात, देतात. कुणालाही याची लाज वाटत नाही. अशा वेळी आपली शिक्षण व्यवस्था किती फोल आहे याची जाणीव होते. शिक्षण म्हणजे भविष्यात पैसे कमावण्यासाठीच्या ATM चा पासवर्ड इतकाच त्याला अर्थ उरतो.

या सर्व पार्श्वभूमीवर समाजाला दिशा देऊ शकणाऱ्या घटकांनी या अनिष्ट प्रथांचा बिमोड करायला स्वतःच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे नुसत्या कागदी डिग्र्या घेतलेल्या पण विचाराने मागासच राहिलेल्या उच्च शिक्षित तरुण तरुणींनी लग्न बाजारात स्वतःला विकण्यापासून थांबवले पाहिजे. मुलींनीही याबाबतीत खंबीर होऊन हुंडा किंवा लग्नात गाड्या वगैरे मागणाऱ्या मुलांच्या आणि त्याच्या लोभी आईवडिलांच्या पार्श्वभागावर लाथा मारून हाकलून द्यायच्या घटना घडल्या तर मागऱ्या लोकांनाही लाज वाटेल. भविष्यातील हजारो वैष्णवींचा बळी जाणे थांबवायचे असेल तर मुलाच्या लग्नात हुंडा घेणार नाही आणि मुलीच्या लग्नात हुंडा देणार नाही ही प्रतिज्ञा प्रत्येकाने मेंदूत ठसवणे ही काळाची गरज आहे.

याची सुरुवात आम्ही आमच्या कुटुंबापासून करणार आहोत. मुलगा, पुतण्या, भाचा यांच्या लग्नात हुंडा घेणार नाही आणि मुलीच्या, पुतणीच्या लग्नात हुंडा देणार नाही. शिवाय लग्नांमध्ये हिडीस ओंगळवाणे प्रदर्शन करणार नाही.

सुधृढ सशक्त समाज घडण्यासाठी हे सर्वत्र घडले पाहिजे.

– प्रमोद गायकवाड, नाशिक
gaikwad.pramod@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here