आशाताई बच्छाव
खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खते व पीक कर्ज, उपलब्ध करुन द्या
– पालकमंत्री पंकजा मुंडे
• जिल्ह्यात खरीप हंगामात 6 लाख 29 हजार हेक्टरवर होणार पेरणी
जालना दि.3 (जिमाका) : खरीप हंगामातील पेरण्या सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी आतापासूनच योग्य नियोजन करण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खरीप हंगामपूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती मुंडे या बोलत होत्या. यावेळी खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार हिकमत उढाण, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुषकुमार नोपाणी, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मैत्रवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, विभागीय कृषी सहसंचालक पी.आर. देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामातील पेरणीचे प्रस्तावित क्षेत्राच्या प्रमाणात बियाणे रासायनिक खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. तसेच पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येवू नये. पुरेसा पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यामध्ये व्यापक जनजागृती करावी. तसेच पीक पेरणीची योग्य पद्धत, बियाणांची निवड आणि पेरणीपूर्व प्रक्रिया पूर्ण करावी.