आशाताई बच्छाव
गृहउपयोगी किचन सेट व सुरक्षा किटचे वाटप ग्रामपंचायत स्तरावर करा
बी.जी.शिंदे , लातूर जिल्हा प्रतिनिधी
राज्य शासनाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सुद्धा महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार कार्यालयाच्या वतीने नोंदणी करत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य किचन सेट व सुरक्षा किटचे वाटप करण्यात येत आहे. मात्र सदर वाटप हे जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच जिल्ह्यांच्या अडगळीत मार्गावर असलेल्या १५ किलोमीटर अंतरावर हरंगुळ बुद्रुक एमआयडीसी एरियातील गोडाऊन स्थित ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी होत असल्याने त्या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगाराची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तथापि या वाटप केंद्रावर बऱ्याच वेळा अनुचित प्रकार घडल्याच्या घटना सुद्धा घडले आहेत. त्यामुळे यापुढे अनुचित प्रकार घडू नये व बांधकाम कामगारांना अडचण जाऊ नये यासाठी आता यापुढे गृहोपयोगी वस्तूंच्या किचन सेटची साहित्याची व सुरक्षा किट साहित्य वाटप प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावे. अशी मागणी परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी व अखिल भारतीय बांधकाम संघटना शाखा अतनूरचे शाखाध्यक्ष चंद्रप्रकाश गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस शाखा अतनूरचे शाखाध्यक्ष अमोल गायकवाड, तसेच राष्ट्रीय मजदूर संघ मराठवाडा विभाग अध्यक्ष एस.जी.शिंदे अतनूरकर, उबाठा शिवसेनेचे जळकोट तालुकाप्रमुख विकास पाटील, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, गव्हाणचे सरपंच बालाजी गुडसुरे, मेवापूरच्या सरपंच सौ.कोमल तुळशीदास पाटील, गुत्तीच्या सरपंच सौ.मीना यादव केंद्रे यांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्य शासनाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तूंच्या किचन सेट साहित्य व सुरक्षा किटचे वाटप सुरू आहे व यासाठी जिल्ह्यातील बांधकाम कामगार किचन सेट व सुरक्षा किट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कानाकोपऱ्यातून येत असल्याने एमआयडीसी हरंगुळ रेल्वे स्टेशनच्या गोडाऊन वर हजारोंच्या संख्येने वाटप केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. यावेळी वाटप केंद्रावर दैनंदिन वाटप संच क्षमते पेक्षा कितीतरी पटीने अधिक बांधकाम कामगारांनी गृहउपयोगी साहित्य किचन सेट साहित्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच नियोजन नसल्याने त्याचा मोठा परिणाम वाटपावर होत आहे. प्रसंगी अनुचित घटना सुद्धा घडत आहे. त्यामुळे शासनाने प्रशासनाला आदेश देऊन सदर किचन सेट व सुरक्षा किट साहित्याचं वाटप जिल्ह्याच्या ठिकाणी व तालुका ठिकाणी न करता प्रत्येक वेळी ग्रामपंचायत स्तरावर करावे म्हणजे वाटप केंद्रावरील गर्दी कमी होऊन त्या ठिकाणी अनुचित घटना घडणार नाही व कामगारांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व त्यांचा वेळही वाया जाणार नाही व आर्थिक भुर्दंड ही बसणार नाही. सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून नोंदणी कृत बांधकाम मजूरदार, कामगार, नोंदणीकृत कामगार आपली साहित्य पेटी, गृहोपयोगी वस्तू किचन सेट व सुरक्षा किट मिळेल याकरिता १८-१८ तास लाईन मध्ये नंबर यावा म्हणून बसत आहेत. काही काही वेळा त्यांना त्या ठिकाणी रात्रभर जागरण करूनही वाटप केंद्राच्या गोडाऊन व राज्य महामार्गावर झोपावे लागले. याकरिता वाटप केंद्रावरील गर्दी कमी होऊन त्या ठिकाणी अनुचित घटना घडणार नाही. व कामगारांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व त्यांचा वेळही वाया जाणार नाही. याच पार्श्वभूमीवर शासनाने, जिल्हा प्रशासनाला किचन किट सेट गृहोपयोगी साहित्य संच व सुरक्षा साहित्य किटचे वाटप ग्रामपंचायत स्तरावर करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी केली आहे.