
आशाताई बच्छाव
महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात राजकीय कुस्ती
अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –जिल्ह्याच्या स्थापनेपासून या जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्राला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र, यंदाचे वर्ष मल्लविद्या पेक्षा राजकीय आखाडा रंगविण्यात जात असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातील कुस्ती संघटनेचे दोन गट झाले. तर राज्यातील राजकीय पक्षांचे दोन गट आहेत. या दोन गटांनी दोन वेगळ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन वेगळ्या ठिकाणी भरवत राजकीय आखाडा रंगवला असल्याची चर्चा आहे.
छबुराव लांडगेंसह अनेकांनी कुस्तीक्षेत्रात दबदबा निर्माण केला
निजाम काळापासून नगर शहरात तालमी होत्या. भारतीय स्वातंत्र्यानंतर छबुराव लांडगे यांच्यासह अनेक जणांनी कुस्तीक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. अहिल्यानगरमध्ये यापूर्वी १९८९ व २०१४मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या होत्या. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात गादीवरील सामन्यांची सुरुवात नगर शहरापासून झाली. ते साल होते १९८९. या सामन्यांचे वार्तांकन केलेले ज्येष्ठ पत्रकार सतीश कुलकर्णी याबाबतच्या आठवणी आवर्जुन सांगतात. यातील पहिल्या स्पर्धेचे नियोजन छबुराव लांडगे यांनी तर दुसऱ्या स्पर्धेचे नियोजन छबुरावांचे नातू वैभव लांडगे यांनी केले.
मागील दोन वर्षांपासून राज्यातील कुस्ती संघटनेमध्ये दोन गट पडले. दोन्ही गटांनी आपण मान्यताप्राप्त असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. यात एक आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व दुसरी आहे महाराष्ट्र कुस्तीगीर संघ. यातील कुस्तीगीर संघाचे राज्य उपाध्यक्ष आहेत अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप. त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धांचे आयोजन केले. संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी या स्पर्धेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीचे अनेक महत्त्वाचे नेते बोलावले होते. मात्र, या स्पर्धेत त्यांनी महाविकास आघाडीचा एकही नेत्याला बोलावले नाही. या स्पर्धेत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आवर्जुन उपस्थित होते. या स्पर्धेपासून जिल्हा तालीम संघ, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व महाविकास आघाडी दूर होते. स्पर्धेचे आयोजन दिमाखात झाले. ही स्पर्धा शेवटच्या दिवशी मल्लांच्यात झालेल्या वादाने गाजली. या स्पर्धेनंतर कर्जत-जामखेडचे
आमदार रोहित पवार यांनी २०१९मध्ये कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आमदार राम शिंदे यांचा पराभव केला. तेव्हापासून राम शिंदे व रोहित पवार यांच्यात राजकीय सत्तासंघर्ष आहे. हा सत्तासंघर्ष कर्जत नगरपालिका निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आला. रोहित पवार व राम शिंदेकडून परस्पर विरोधी राजकीय डाव-प्रतिडाव सुरू असतात. अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्यावेळी राम शिंदेंना मान मिळाला. यात रोहित पवारांना स्थान नव्हते. त्यामुळे त्यांनी कर्जतमध्येच महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवून राम शिंदे यांना काटशह देण्याचा घाट घातल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला एक काळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राजकीय आश्रय होता. अजूनही भारताच्या कुस्ती क्षेत्रात शरद पवार यांचा शब्द प्रमाण मानला जातो. याचा फायदा रोहित पवार यांना स्पर्धा भरविण्यात झाला.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्रात छबुराव लांडगे व त्यांच्या कुटुंबाचा दबदबा राहिला आहे. एककाळ दख्खन का काला चित्ता म्हणून छबुराव लांडगे यांची ओळख सबंध महाराष्ट्राला होती. जिल्हा तालीम संघाचे नेतृत्त्व याच कुटुंबाजवळ राहिले आहे. छबुराव लांडगेंचा वारसा त्यांचे नातू वैभव लांडगे पुढे चालवत आहेत. वैभव लांडगे हे भाजपचे पदाधिकारीही आहेत. २०१३च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन महापौर तथा विद्यमान आमदार संग्राम जगताप व वैभव लांडगे यांचे सत्तासंघर्ष झाले. त्यातून दोघांत राजकीय वैर निर्माण झाल्याचे सांगितले जाते. ज्यावेळी कुस्ती संघटनेत दोन गट निर्माण झाले त्यावेळी वैभव लांडगे यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बाजूने राहणे पसंत केले. त्यावेळी जिल्ह्यातील लांडगे यांच्या विरोधातील काही जणांनी महाराष्ट्र कुस्तीगीर संघात जावून जिल्ह्यात कुस्तीची नवीन संघटना तयार केली. या संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांचे पाठबळ मिळवले आणि कुस्तीची आवड असलेले जगताप कुटुंब पहिल्यांदाच कुस्तीच्या राजकीय मैदानात उतरले. पुढे २०२४ची विधानसभा निवडणूक झाल्यावर त्यांनी २०२५ वर्षांच्या सुरुवातीला अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून दाखवले. त्यामुळे त्यांना संघटनेने राज्य उपाध्यक्षपद दिल्याचे सांगितले जाते. या स्पर्धेनंतर रोहित पवार यांनी कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले. त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाने रोहित पवार यांच्याकडे आमच्या संघटनेतर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याची गळ घातली. रोहित पवारांनाही राम शिंदेंना काटशह देण्याची ही संधी वाटली आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्यात आली.
रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जिल्हा तालीम संघ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, जिल्हा तालीम संघाचे वैभव लांडगे हे राम शिंदे यांचे समर्थक आहेत. दोघांतील मैत्री राजकीय भूमिकांच्या वेळी दिसून येते. त्यामुळे जिल्हा तालीम संघ स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावत असताना वैभव लांडगे मात्र या स्पर्धेपासून दोन हात लांब राहत असल्याची चर्चा आहे. जिल्हा तालीम संघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्यासाठी रोहित पवार यांना पत्र दिले त्यावेळी वैभव लांगडे उपस्थित नसणे, स्पर्धा सुरू होऊन दोन दिवस होऊनही तेथे न जाणे हे याचे द्योतक असल्याचे सांगितले जात आहे.
राम शिंदेंना काटशह देण्यासाठी रोहित पवार यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जतमध्ये आयोजित केली खरी मात्र, कर्जतमध्ये एवढी मोठी स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुरेसे नियोजन होते का? हा मोठा प्रश्न आहे. कर्जत सारख्या गावात ऐन उन्हाळ्यात सुमारे एक हजार लोकांना राहणे व खाण्याची सोय करणे कठीण बाब आहे. स्पर्धेतील मल्लांच्या नुसार नियोजनाचे तीन गट तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्र केसरी गटातील मल्लांना राहण्यासाठी लॉजिंगची सोय केली आहे. त्यानंतरच्या गटातील मल्लांना राहण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या दोन शाळांत सोय करण्यात आली आहे. मल्ल शाळेत राहणार असल्याने व त्यातील एक शाळा मुलींची असल्याने चक्क शाळांनाच महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू असे पर्यंत सुटी देण्यात आल्याचे समजते. उर्वरित मल्ल व त्यांच्या प्रशिक्षकांना स्पर्धा आयोजनाच्या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. स्पर्धेतील नियोजनात अनेक त्रुटी कर्जतकरांना जाणवू लागल्या आहेत. या निकाल लागण्यासाठी ते लढती घडवण्यापर्यंत मोठी यादीच स्थानिक लोक सांगत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा कशी पार पडणार यावर मतमतांतरे दिसत आहेत. मात्र, ही स्पर्धा मल्लांएवढीच राजकीय आखाड्यातील शह-काटशहचे डावपेच रंगविणारी लढत ठरत आहे.