आशाताई बच्छाव
राहुरीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आंदोलकांनी महामार्ग रोखला अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
राहुरीतील बुवा सिंद बाबा तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे आज (ता.२६) दुपारी लक्षात आले. त्यामुळे लोक संतप्त झाले. त्यांनी तत्काळ गावातून निषेध मोर्चा काढला. गावात व्यापारी, व्यावसायिक यांना बंदचे आवाहन केले. तत्काळ पूर्ण बाजारपेठ बंद झाली. आंदोलकांनी नगर-मनमाड महामार्ग रोखून धरला आहे. आरोपीला तत्काळ अटक केली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , उपविभागीय पोलिस अधिकारी व बसवराज शिवपुजे पोलीस पथकासह घटनास्थळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.आंदोलकांनी टायर जाळण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे राहुरीत तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलनस्थळी आमदार शिवाजी कर्डिले दाखल झाले आहेत. यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे, नंदकुमार तनपुरे, सुनील भट्टड, भाऊ वराळे आंदोलनात सहभागी झाले आहेत.