आशाताई बच्छाव
आदिवासी पाड्यावर आदिवासींची दिवाळी केली गोड !
● मोहिते महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकीची
पालघर | सौरभ कामडी
खोडाळा : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून मुंबई व मुंबई उपनगरातील सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकी जपत आदिवासींची दिवाळी गोड करतात. खोडाळ्यातीळ मोहिते महाविद्यालय आणि मुंबई येथील श्रीनिवास सावरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुलकर आणि परिवार सहविचारी सहकाऱ्यांच्या माध्यमातून मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या दत्तक गाव कोचाळे येथे आदिवासी बांधवांची गोड खाऊ, कपडे आणि शैक्षणिक साहित्य वाटप करत आदिवासींची दिवाळी गोड केली.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट, फराळाचा आस्वाद अन् फटाक्यांची आतिषबाजी हे नेहमी दिसणारे चित्र असले तरी, शहरी भागापासून दूर ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यावस्तींवर, कसे तरी उभ्या असलेल्या कुडाच्या झोपडीतील आदिवासींचे चित्र म्हणजे अगदी त्याउलट. तिथे दिवाळी सण असो अथवा इतर कुठलाही सण म्हणजे एकप्रकारे अनेक कोस दूरचे अंतर. अशा या आदिवासी दिनदुबळ्यांच्या जीवनात एकप्रकारे दिपावलीची पणती पेटवण्याचे काम नूलकर आणि परिवार गेल्या सहा वर्षांपासून करत आहे.
यंदाच्या दीपावलीतही ‘एक करंजी मोलाची’ व ‘एक वस्त्र मोलाचे’ हे उपक्रम राबवून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचारी आणि मोहिते महाविद्यालय खोडाळा जोगलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दत्तक गाव कोचाळे येथे १२० आदिवासी, गरजू कुटुंबाना दिवाळी व भाऊबीजेनिमित्त फराळाचे व मिठाई वाटप करण्यात आली. तसेच ७०-८० महिलांना भाऊबीजेच्या औचित्य साधून पातळ व साड्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीने दिवाळी गोड करण्याचा उपक्रम मोहिते महाविद्यालयाकडून राबविण्यात आला.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव…सर्वांसाठी हा उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच…मात्र वर्षानुवर्षे दारिद्र्य आणि बेरोजगारीत खितपत पडलेल्या आदिवासी व गोरगरीबांच्या आयुष्यात कसली आली दिवाळी. त्यांच्याही आयुष्यात दिवाळीची पाडवा पहाट उजाडावी. त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलावा, या नि:स्वार्थ भावनेने या आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल या शालेय साहित्य वाटप करण्यात करून गावातील प्रत्येक कुटुंबात दिवाळी फराळ पॅकेट भेटवस्तू म्हणून देण्यात आले. तसेच गावात स्थापन केलेल्या लोकशाही वाचनालयात अनेक ग्रंथ, कादंबऱ्या व शालेय उपयोगी शैक्षणिक पुस्तके भेट देण्यात आल्या. यावेळी महेश ठाकूर, जितू पवार, विजय कस्तुरे, विकास हरचेकर, चंद्रकांत घोले, चंद्रशेखर मायदेव, महेश जेरे, अनिल बोडस, नितीन जोशी,श्रीकांत बोटेकर, प्रसाद नूलकर, संजय राणे
कलाश्री डोंगरे, राजश्री बोटेकर, अपूर्वा पवार, मोहिते महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. तुकाराम रोकडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नवनाथ शिंगवे, प्रा. कैलास पाटील आदी उपस्थित होते.