Home रायगड अलिबाग तालक्यातील मेढेखार गावी येथील मोहरममध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन !

अलिबाग तालक्यातील मेढेखार गावी येथील मोहरममध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन !

47
0

आशाताई बच्छाव

1000559299.jpg

अलिबाग तालक्यातील मेढेखार गावी येथील मोहरममध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन !

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे वर्षानुवर्षे स्थानिक हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोहरम सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात, यासाठी बुधवार दि. १७ जुलै २०२४ रोजी मोहरम ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी व ताजियाचे दर्शन घेण्यासाठी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड भयांनी सहकुटुंब मित्रपरिवारांसह उपस्थिती लावली. यावेळी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बयावेळी पिंट्या गायकवाड यांनी मोठ्या भक्तिभावाने मोहरम निमित्ताने पिर बाबांच्या ताजियाचे पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले, तेव्हा मेढेखार ग्रामस्थांनी पिंट्या गायकवाड यांचा जाहीर सत्कार करत नाचणाऱ्या पहिल्या फळीचा मान दिला. पिंट्या गायकवाड यांनी दिलेला मान स्वीकारून मोहरम च्या ताजियाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला. तद्नंतर मोहरम साजरा करणाऱ्या हिंदू मुस्लिम समाजातील ज्येष्ठांकडून मोहरम साजरा करण्याची आख्यायिका समजून घेतली. यावेळी गायकवाड यांनी सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने मोहरम करत असल्याचे पाहून भावुक झाले.

पिंट्या गायकवाड यांनी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मोहरम सणाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड, नदीम आत्तार, कृष्णा जेथे व इतर मित्रपरिवारांसह व कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेढेखार येथील स्थानिक ग्रामस्थ हरिश्चंद्र म्हात्रे यांनी मोहरम सण हिंदू मुस्लिम बांधव एकत्र साजरा करण्याच्या परंपरेला कशी सुरुवात झाली याबाबत विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही सर्व समाजातील ग्रामस्थ २०० वर्षांपासून मोहरम सण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत, २०० वर्षांपूर्वी आमच्या गावालगत असलेल्या खाडीला वारंवार खांड (बांधबंदिस्ती फुटून) जाऊन आमच्या गावात व शेतशिवारात खाडीचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. यामुळे आमचे ग्रामस्थ मोठ्या संकटात सापडले होते, याच दरम्यान गावाजवळ काही ग्रामस्थांना दोन फकीर दिसले, त्यांना खांड जाऊन होत असलेल्या नुकसानी बाबत सांगितले. यावर त्यांनी सांगितले की, आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्ही अमुक ठिकाणी खांड (बांधबंदिस्ती) करा, यामुळे पुन्हा असा त्रास आपणांस होणार नाही, असे सांगून निघून गेले. यावर ग्रामस्थांनी विचारविनिमय करून लगेच फकिरांनी सांगितल्या प्रमाणे व सांगितल्या ठिकाणी खांड बांधली असता त्यामध्ये यश आले.

यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तेव्हा ग्रामस्थांनी फकीर बाबांचा शोध घेतला असता ते दिसून आले नाही. याचवेळी एका ग्रामस्थाला स्वप्नात साक्षात्कार झाला, त्यांनी गावाजवळ असलेल्या छोट्या दर्याच्या जवळपास असलेल्या व अचानक निर्माण झालेल्या मुंग्यांच्या वारूळाच्या ठिकाणी खोदकाम केले असता त्यांना दोन पंजे मिळून आले. याबद्दलची माहिती गावात समजल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय करत मोहरम साजरा करण्याचे ठरवले. तेव्हापासून आम्ही गावात पिर बाबांचा मोहरम सण साजरा करत आहोत. हा सण साजरा करण्यासाठी मेढेखार गावासह पंचक्रोशीतील सर्व समाजातील ग्रामस्थ, नातेवाईक व अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील इतर भाविक यावेळी दर्शनासाठी व पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात.

दहा दिवस चालणाऱ्या मोहरम सणात श्रीगाव, नागोठणे येथील मुस्लिम बांधव फातिहा देण्यासाठी येतात, याठिकाणी पिर बाबा भक्तांच्या नवसाला पावत असल्याचे दिसून आल्याचे काही ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यामुळे याठिकाणी भाविक दर्शनासाठी येवून अथवा जिथे असतात तिथूनच पिर बाबांच्या नावाने देवांकडे गाऱ्हाणे मांडत असतात आणि पिर बाबांनी गाऱ्हाणे पूर्ण केल्यानंतर त्यांचे नवस मोहरम च्या दिवशी पिर बाबांच्या मंदिरात येवून ते पूर्ण करण्यासाठी येतात. यावेळी शेवटच्या दिवशी विसर्जनाच्यावेळी बाबांच्या स्वारीवर पावसाप्रमाणे पेढे उडविले जातात, उडविलेले पेढे गोळा करण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडत असते. याचबरोबर नवसामध्ये कोंबडा, बोकड, पेढे, वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, फळांची तुला, गुळाची तुला आदी इतर प्रकारचे सांगितलेले नवस भाविक पूर्ण करतात. यानंतर दुपारी अडीच वाजता गावामधून वाजतगाजत विसर्जन मिरवणुक काढण्यात येते व संध्याकाळी सूर्यास्तानंतर ताजियाचे विसर्जन करण्यात येते, विसर्जन मिरवणुकीवेळी दोन मिनिटे स्तब्ध राहून स्वर्गवासी झालेल्यांना

श्रद्धांजली वाहिली जाते, असे शेवटी म्हात्रे यांनी सांगितले.

Previous articleजानेफळ पंडित येथे मयूर बोर्डे यांचे विमा कंपनीच्या अन्याया विरोधात अन्नत्याग उपोषण
Next articleदर्शनाहून परतणा-या वारक-यांची जीप विहिरीत कोसळली; सातजण ठार: जालना जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here